मी ’राईट लेन’ मधून गाडी चालवत होतो. उजव्या बाजूला पत्र्याची भिंत उभारलेली रस्त्याच्या कामानिमित्त. आणि अशात एकदम, हॉर्न न वाजवता किंवा इतर कुठलाही संकेत न देता एक बाईक कुठल्याशा फ़टीमधून अचानक गाडीसमोर अवतरली. मी अचंबित, क्रोधित वगैरे व्हायच्या आतच तडमडत तो बाईकवाला पुढे निघून गेला.सुदैवाने आमची वाहने भिडली नाहीत, घासली नाहीत; नाहीतर खरंच तो पडला असता आणि मग गोंधळ झाला असता.
पिझ्झा हट चा पोचव्या होता तो. हे पिझ्झा पोचवणारे...अनेकदा बघतो त्यांना आणि ते सगळेच भयानक रॅश चालवतात बाईक. दोष सर्वस्वी त्यांचा नाही. ’३० मिनिट.. नही तो पिझ्झा फ़्री’ अशी अॅड करणारे यांच्याच जिवावर अॅड करतात. मला माहित नाही यांची सिस्टिम काय असते ते. पण बहुदा ३० मिनिटांच्या आत पोचवून ’फ़्री’ पिझ्झा देणं टाळलं की ईन्सेन्टिव्ह असावा, आणि फ़्री पिझ्झा द्यावा लागला तर पेनल्टी असावी. कारण अक्षरश: जिवावर उदार होऊन ते बाईक चालवत असतात, पर्यायाने स्वत:चा आणि इतरांचा जीव धोक्यात घालत असतात.
मला फ़ार दया येते त्यांची. आजवर मी कधीही फ़्री पिझ्झा मागितलेला नाही आणि मागणारही नाही ते याच कारणासाठी. मी उलट त्या माणसाला सांगतो की बाबा हळू चालव. मला राग अशा अॅड करणा-यांचा येतो. मुंबई-ठाण्याच्या ट्रॅफ़िक मधे आज कुठलाच माणूस एखाद्या ठिकाणी वेळेवर पोचण्याची हमी देऊ शकत नाही अशी अवस्था आहे, आणि त्यात या अशा ऑफ़र किंवा स्कीम म्हणजे चक्क मूर्खपणा आहे.
माझं फ़क्त असं सांगणं आहे की पिझ्झा कंपन्यांनी एवढं लक्षात घ्यावं की त्या ३० मिनिटापायी जीव जायला ३० सेकंद सुद्धा लागणार नाहीत. तेंव्हा ३० मिनिट नही तो फ़्री म्हणताना डिलिव्हरी बॉईज चा जरा विचार करावा. आणि एक पिझ्झा फ़्री घेतला म्हणजे आपलीही फ़ार मोठी अचीव्हमेंट किंवा सेव्हिंग होत नाही त्यामुळे ३५ व्या मिनिटाला पिझ्झा आला तर फ़्री मागताना आपणही विचार करायला हवा.
No comments:
Post a Comment