Friday, December 28, 2012

जगाचा अंत


दिवस उजाडता भीती आहे, रात्र होता धास्ती आहे
उद्याचा दिवस चांगला असेल याची कुणाला खात्री आहे?
आता लोकांकडे पैसा आला आहे, चांगल्या आणि वाईट मार्गांनी
पैशाबरोबर माज आला आहे, अहंकार आला आहे, उद्दामपणा आला आहे
शिरजोरी करायची, स्वैराचार करायचा हीच वृत्ती झाली आहे
आपुलकी, प्रेम, सामंजस्य, सद्विचार, संस्कृती हे खोटे शब्द झालेत
मिळतं त्यात कुणीच संतुष्ट नाही, काही मिळवण्यासाठी कष्ट नाही
सगळं आयतं हवं आहे; हवंच आहे; आणि ते नाही मिळालं तर...
ते नाही मिळालं तर माणसं कुठल्याही थराला जाऊ लागली आहेत
खून, मारामा-या, चो-या, बलात्कार...
रोज; दररोज या अशाच बातम्या बघाव्या लागत आहेत, ऐकाव्या लागत आहेत
हटवाद, छळवाद, चंगळवाद, आणि वासनेचा समाजाला ज्वर झालाय
भौतिक प्रगती झाली असेल पण नैतिक अधोगतीचा कहर झालाय
नात्यांची तर गोष्टच वेगळी; ती काय असतात हेच कुणाला ठाऊक नाही
पैशाने माणसं जोडावी, पैशासाठी तोडावी; माणसांचं कुणाला कौतुक नाही
सगळा समाज आत्मकेंद्री झालाय, स्वार्थी झालाय, हैवान झालाय
निसर्गही त्याला अपवाद नाही; तोही आता सैतान झालाय
भूकंप होत आहेत, पूर येत आहेत, प्रकोप होतो आहे

कसलीच; कुणाचीच; शाश्वती नाहीये
सगळं अनाकलनीय झालंय, असंबद्ध झालंय, अतर्क्य झालंय

‘हा’ जगाचा अंत नाही तर आणखी काय आहे?

2 comments: