Saturday, September 1, 2012

मराठी दैनिक साबण (डेली सोप) - भाग २

दैनिक साबणांनी दिवसेंदिवस आपला बार रेज करायचं सातत्य ठेवलंय. नवनवीन सिरियल्स, नवनवीन पात्रं (दोन्ही अर्थांनी), नवनवीन गोष्टी.


  • या सिरियल्स मधली आडनावं फार ‘सर’स असतात. सरनाईक, सरदेशमुख, सरपोतदार, सरनौबत अशी. हे ‘सर’ सध्या ट्रेंड मधे आलंय त्यामुळे. आपल्या नावाला ‘ग्रॅंड’ करायला लोकं आडनावाच्या मागे ‘सर’ लावू लागलीयत म्हणे. म्हणजे सरगोखले, सरकुलकर्णी, सरजोशी वगैरे.
  • पर्म्युटेशन कॉंबिनेशन च्या तत्वाप्रमाणे, कधी सिरियल मधला नायक गरीब असतो (तरीही मोबाईल, बाईक, कार, लॅपटॉप ही श्रीमंतीचा मापदंड असणारी उपकरणे त्याच्याकडे असतात) तर कधी नायिका गरीब आणि गावातून आलेली (तरीही फॅशन मधे मुंबईतल्या मुलीला फीट आणण्याची क्षमता असलेली) असते.
  • ‘क्षणात येते सरसर भरभर क्षणात फिरुनी ऊन पडे’ या कवितेतल्या ओळीप्रमाणे, सिरियलमधल्या कुटुंबात एक दिवस कोट्यांच्या व्यवहारांच्या चर्चा होतात आणि दुस-या दिवशी त्या लोकांना तीन चार लाखांची कर्ज घेण्याची पाळी येते. बरं या सगळ्या घटना होत असताना त्यांचं आलिशान घर, नव्हे वाडा, दागिने, या गोष्टी अढळ असतात.
  • बहुतांश सिरियल मधे नायक किंवा नायिकांच्या वडिलांचे ‘बिजनेस’ असतात ‘बिजनेस’. आणि त्यात अर्थातच त्या नायक किंवा नायिकेला एन्ट्री असते. त्यांच्या ऑफिसांमधे ते टाय, ब्लेझर वगैरे घालून जातात. आणि भर कॉरिडॉर मधे रस्ता स्टाईल भांडणं करतात (कॉलर वगैरे धरून). ही भांडणं होत असताना बाकी कर्मचारी एकमेकांकडे बघून ‘काय ना !’, ‘बघा ! असं चालतं’ असे हावभाव करत रहातात.
  • यातल्या नायक नायिका कधीकधी खूप धार्मिक असतात. सिरियल मधे मुंबई सारख्या शहरात सुद्धा साधारण एकटं, शांतं, जिथे गर्दी नाहीच असं देऊळ असतं. तिथे तो नायक किंवा नायिका जाते, धडा मोठ्याने वाचल्याप्रमाणे आपली इच्छा बोलून दाखवते. (बाजूला ‘तनहाई....’ पोज मधे बसलेले भटजी/गुरुजी ते ऐकत असतात.) मग एक फूल हमखास त्या मूर्तीवरून नायक/नायिकेच्या हातात किंवा पुढ्यात पडतं. ‘बिंगो’ ! ‘अ‍ॅप्रूव्ह्ड’
  • सिरियल्स हे फॅशन चं उगमस्थान आहे. साड्या, ड्रेस, मोठ्या टिकल्या, नेकलेस, कानातले, नाकातले.... डिझायनर्स चं हेच तर प्रेरणास्थान असतं.
  • या सिरियलचे डायलॉग रायटर खूप तणावाखाली असावेत किंवा गांजा पिऊन लिहीत असावेत. कारण डायलॉग ऐकून बघणा-याला किक बसते हो ! (किंबहुना द्यावीशी वाटते). देवळात कुणी भेटलं की प्रश्न येतो ‘इथे काय करताय?’ (शॉपिंग ला तर नाही येणार कुणी देवळात). किंवा हॉस्पिटल मधे दोन व्यक्तींची भेट होते आणि एक व्यक्ती दुस-या पेशंटला प्रश्न करते, ‘बरं नाहीये का?’
  • ‘एकमेका सहाय्य करू...’ हे आजकाल नवीनच बघायला मिळू लागलंय. नव्हे; सासू सुनेला सहाय्य करते वगैरे असलं काही नाही. एक सिरियल दुस-या सिरियल ला सहाय्य करते. म्हणजे नवीन सुरू होणा-या सिरियल ची नटी मावळत्या सिरियल च्या नटीची मैत्रीण (अचानक) बनून प्रकट होते आणि ‘आता मी तुम्हाला पिडायला येणार’ हे बजावून जाते. सगळ्या सिरियल त्यांच्या स्पॉन्सर्स ना सहाय्य करतात. मग त्यासाठी सिरियल च्या नायिकेला "‘लॉरियल’ चा हेअर कलर लाव; बघ तुझे केस किती छान होतील" असा डायलॉग मारावा लागतो.

एकूणच काय; सगळं कमर्शियलाईझ. सगळ्याचं व्यवसायिकरण. नट-नट्यांचं, प्रसंगांचं, भावनांचं, प्रेक्षकांचं, सगळ्याचंच. आनंदी आनंद !

8 comments:

  1. Mast:)
    he commercialisation kami mhanun ata soap madhe embedded jahirati ahet. Tya sahan hot nahi, sangtahi yet. Nahit ashya ahet... Eg. ELDG madhe garnier, kimwa. Walls ice cream chi advt. Kahar!

    ReplyDelete
  2. Bhaarriii ahe :) ani ajun ek gosht mhanje... don wyakti ekmekanpasun lamb ubhya astat tar tyatlya eka wyaktila lapun dusrya wyakticha bolna aikaycha asta.. ajubajula gardi aste.. loka yet jat astat pannnnn... that particular character manages to listen everything :)

    ReplyDelete
  3. anandi anand...
    very good
    keep saying it...

    ReplyDelete
  4. मस्त...
    >>>त्यांच्या ऑफिसांमधे ते टाय, ब्लेझर वगैरे घालून जातात. आणि भर कॉरिडॉर मधे रस्ता स्टाईल भांडणं करतात (कॉलर वगैरे धरून). ही भांडणं होत असताना बाकी कर्मचारी एकमेकांकडे बघून ‘काय ना !’, ‘बघा ! असं चालतं’ असे हावभाव करत रहातात.
    हे Epic आहे :D

    ReplyDelete