नोकरीत बढती मिळत नाही, पैशाची चणचण मिटत नाही, घरगुती वातावरण अशांत, अशी समस्यांची चेकलिस्ट घेऊन अमूकगावातला एक माणूस तमूकगावातल्या एका खूप मान्यता असलेल्या गणपतीच्या देवळात हजर झाला. त्याच्याच आयटी कंपनीत काम करणा-या एका मित्राने हे देऊळ त्याला ‘रेफर’ केलं ‘रेफर’. तर साहेब लगोलग गाडी बुक करून तमूकगावाला रवाना झाले आणि देवळात पोचले. ‘जे जे शक्य आहे ते ते करून बघू’ असं म्हणून.
"देवा, फार लांबवरून तुझ्याइथे आलोय. तू सगळ्यांकडे बघत असतोसच. तुला माझीही अवस्था दिसत असेल. माझी स्वप्न कशी अर्धवट राहतायत, त्यांच्या पूर्ण होण्यात कशा आणि कुठल्या अडचणी येतायत, हे दिसत असेल. तरीही. देवा, मला नोकरी करून ४ वर्ष झाली पण हवी तशी प्रगती झाली नाही. कंपनीतल्या राजकारणामुळे मी डावलला जातोय. त्यामुळे पगार वाढत नाही, पण गरजा आ वासून उभ्या आहेत. घरात त्यावरून वाद होतात. कुठेच शांतता नाहीये. खूप आशेने तुझ्याकडे आलोय, कृपा कर, माझ्या या अडचणी दूर कर. मी दर वर्षी इथे येईन, तुला ५१ नारळ वाहीन."
"झालं बोलून?"
(थबकून)"कोण?.... कोण बोललं?"
"मीच मीच. ज्याच्याशी आत्ता तू बोललास, मनातल्या मनात."
"(अतिशय हर्षोल्हासित होऊन) खरंच!! मी स्वप्नात तर नाही..."
"ठीक आहे ठीक आहे. सिरियलगिरी नकोय. तर तू, कुठून?... अमूकगावातून इथवर आलास. का रे बाबा? अमकेगावातही माझं देऊळ बांधलंय ना तुम्ही, इतर देवांची देवळंही आहेतच की तिथे."
"हो देवा त्या देवळातही मी नेमाने जातो"
"मग? ‘रिझल्ट मिळत नाही म्हणून दुसरे ‘ऑप्शन्स’ ट्राय करतोयस?"
"नाही... असं नाही... तू नवसाला पावतोस असं मला माझा मित्र म्हणाला..."
"तुमचा एरिया माझ्या स्कोप ऑफ ऑपरेशन मधे येत नाही. असं तुमच्या सरकारी किंवा कॉरपोरेट भाषेतलं वाक्य म्हणावसं वाटतंय मला. आणि तसंच आहे बरं का. तुम्ही आपल्या गावातली देवळं सोडून लांबलांबच्या कुठल्या देवांचं वर्कलोड का वाढवता रे? का आमची सिस्टिम डिस्टर्ब करता तुम्ही? साउथ चे लोक सिद्धिविनायकाला मुंबईत. नॉर्थची मंडळी लालबागच्या राजाला साकडं घालणार, मुंबईत. मुंबईतले स्टार जाणार बालाजी ला. बंगालची माणसं आणखी कुठे राजस्थान ला.
तुम्ही मानवप्राणी ना जाम इंपेशंट झालायत. तुम्हाला बनवताना मी ‘आशा’ नावाचं एक सगळ्यात सक्षम रसायन तुमच्यात ओतलं होतं. त्याची ‘नशा’ झालीय आता ‘नशा’. हातचं सोडून पळत्याच्या मागे, काखेत कळसा गावाला वळसा, एक ना धड भाराभर चिंध्या. या म्हणी तुम्हीच बनवल्यात; त्या तुम्ही शिकलात शाळेत. उपयोग काय?" सिद्धिविनायकाला जाऊन एक आठवडा नाही झाला, चालले शिर्डीला. तिथे जाऊन ४ दिवस नाही झाले, की तुम्ही कसलासा मंत्र सुरू करता जपायला. तोही सातत्याने नाही; आणि मग ‘रिझल्ट’ नाही आला की तिसरा देव. अरे काय चालवलंय? ही रेल्वेची तिकिट विंडो नाही की जिथे कमी रांग दिसते तिथे उभं रहावं. किंवा आमची देवळं म्हणजे वेगवेगळी हॉटेलं नाहीत कि आज चायनिज खाल्लं, उद्या पंजाबी, परवा कॉंटिनेंटल, तेरवा ब्राह्मणी. लाईन अॅंड लेन्ग्थ सातत्यपूर्ण ठेवा की जरा."
"मला पटतंय देवा.... पण... आमच्या समस्या आम्हाला असं बिथरायला भाग पाडतात"
"अच्छा म्हणजे समस्या तुमच्या पेक्षा बलवान झाल्या तर. मग तुम्हाला दिलेल्या बुद्धी, आत्मविश्वास, विचार, समज, या गोष्टी कुठे हरवल्या? मुळात तुमच्या मनात आम्ही जो आमचा ३जी सॅटेलाईट फोन बसवलेला असतो. तो तुम्ही कधी डायलच करत नाही. कधी मनन, चिंतन करतंच नाही. काही झालं की लगेच आय एस डी फोन करायला नाहीतर चॅट करायला देऊळरूपी सायबर कॅफेत येता. असं नसतं रे करायचं. काही फीचर्स आम्ही आमच्या प्रत्येक मानवात इन्बिल्ट बसवलेली आहेत. ती फीचर्स वापरलीच नाहीत तर तुम्हाला तुम्ही कीती ‘केपेबल’ आहात हे कधीच कळायचं नाही. काही गोष्टी आम्ही आमच्या लोकल देवळांत डेलिगेट केलेल्या आहेत, तेंव्हा लगेच असे इशू एस्कलेट करायचे नाहीत. किंवा भांबावल्यासारखं वेगवेगळी देवळं हंट करत फिरायचं नाही. विश्वास ठेवायचा. संयम ठेवायचा. प्रोसेस चालू असते. अरे प्रोग्रॅम लिहिणं एक वेळ सोपं असतं पण त्यातला बग काढायला वेळ लागतो. इन्स्टंट नसतात सगळ्या गोष्टी. आणि फरक कसा आहे माहित्ये, आम्ही सगळे एक आहोत; आणि तुमच्या एकेकाला सगळे हवे असतो."
"मला खरंच सगळं कळलंय, समजलंय आणि पटलंय.... मी आणखी काहीच म्हणत नाही आता"
"हं ! तेंव्हा आता शांत रहा. चांगल्या गोष्टी करत रहा. तू इथवर आलास, तुझी केस एक्स्पिडाईट करतो मी. माझ्या म्हणण्याचा वाकडा अर्थ घेऊ नकोस. तुम्हा मानवांना कीड लागलीय असे गैरसमज करून घेण्याची. देवळात या तुम्ही; मला आवडतं तुम्हाला भेटायला. पण काही गोष्टी आपल्या ३जी सॅटेलाईट फोन वरूनच बोलंत जाऊ आपण. तो जास्त जलद आणि परिपूर्ण संवाद असतो. कळलं?"
"हो. (हसतो)"
"तथास्तू"
Ohh.. Great!
ReplyDeleteClassic post..!
किती कंटेंट भरला आहे एकेका शब्दात.
Thanks Durit ! Anek Dhanyawaad !
Deleteमला उगाच हापिसात गेल्यासारखं वाटतंय ही पोस्ट वाचून..
ReplyDeleteमग काय झाला का इश्यु रिझॉल्व्ह ;)
HEHE :D
DeleteFaar bhari!!! Great post after a long time!!!
ReplyDeleteAnek Dhanyawaad !
Deleteउत्कृष्ट! ओक साहेब सोडा बाकीचे धंदे आणि पूर्णवेळ पत्रकारिता सुरु करा. स्तंभलेखक म्हणून नाम कमवाल!
ReplyDelete:):) Dhanyawaad!
DeleteToo good......Halli asach anjan ghalav lagata lokanchya dolyat :-) :-) keep up d good work .
ReplyDelete