Sunday, September 23, 2012

अधीर उपाशी


नोकरीत बढती मिळत नाही, पैशाची चणचण मिटत नाही, घरगुती वातावरण अशांत, अशी समस्यांची चेकलिस्ट घेऊन अमूकगावातला एक माणूस तमूकगावातल्या एका खूप मान्यता असलेल्या गणपतीच्या देवळात हजर झाला. त्याच्याच आयटी कंपनीत काम करणा-या एका मित्राने हे देऊळ त्याला ‘रेफर’ केलं ‘रेफर’. तर साहेब लगोलग गाडी बुक करून तमूकगावाला रवाना झाले आणि देवळात पोचले. ‘जे जे शक्य आहे ते ते करून बघू’ असं म्हणून.

"देवा, फार लांबवरून तुझ्याइथे आलोय. तू सगळ्यांकडे बघत असतोसच. तुला माझीही अवस्था दिसत असेल. माझी स्वप्न कशी अर्धवट राहतायत, त्यांच्या पूर्ण होण्यात कशा आणि कुठल्या अडचणी येतायत, हे दिसत असेल. तरीही. देवा, मला नोकरी करून ४ वर्ष झाली पण हवी तशी प्रगती झाली नाही. कंपनीतल्या राजकारणामुळे मी डावलला जातोय. त्यामुळे पगार वाढत नाही, पण गरजा आ वासून उभ्या आहेत. घरात त्यावरून वाद होतात. कुठेच शांतता नाहीये. खूप आशेने तुझ्याकडे आलोय, कृपा कर, माझ्या या अडचणी दूर कर. मी दर वर्षी इथे येईन, तुला ५१ नारळ वाहीन."

"झालं बोलून?"

(थबकून)"कोण?.... कोण बोललं?"

"मीच मीच. ज्याच्याशी आत्ता तू बोललास, मनातल्या मनात."

"(अतिशय हर्षोल्हासित होऊन) खरंच!! मी स्वप्नात तर नाही..."

"ठीक आहे ठीक आहे. सिरियलगिरी नकोय. तर तू, कुठून?... अमूकगावातून इथवर आलास. का रे बाबा? अमकेगावातही माझं देऊळ बांधलंय ना तुम्ही, इतर देवांची देवळंही आहेतच की तिथे."

"हो देवा त्या देवळातही मी नेमाने जातो"

"मग? ‘रिझल्ट मिळत नाही म्हणून दुसरे ‘ऑप्शन्स’ ट्राय करतोयस?"

"नाही... असं नाही... तू नवसाला पावतोस असं मला माझा मित्र म्हणाला..."

"तुमचा एरिया माझ्या स्कोप ऑफ ऑपरेशन मधे येत नाही. असं तुमच्या सरकारी किंवा कॉरपोरेट भाषेतलं वाक्य म्हणावसं वाटतंय मला. आणि तसंच आहे बरं का. तुम्ही आपल्या गावातली देवळं सोडून लांबलांबच्या कुठल्या देवांचं वर्कलोड का वाढवता रे? का आमची सिस्टिम डिस्टर्ब करता तुम्ही? साउथ चे लोक सिद्धिविनायकाला मुंबईत. नॉर्थची मंडळी लालबागच्या राजाला साकडं घालणार, मुंबईत. मुंबईतले स्टार जाणार बालाजी ला. बंगालची माणसं आणखी कुठे राजस्थान ला.
तुम्ही मानवप्राणी ना जाम इंपेशंट झालायत. तुम्हाला बनवताना मी ‘आशा’ नावाचं एक सगळ्यात सक्षम रसायन तुमच्यात ओतलं होतं. त्याची ‘नशा’ झालीय आता ‘नशा’. हातचं सोडून पळत्याच्या मागे, काखेत कळसा गावाला वळसा, एक ना धड भाराभर चिंध्या. या म्हणी तुम्हीच बनवल्यात; त्या तुम्ही शिकलात शाळेत. उपयोग काय?" सिद्धिविनायकाला जाऊन एक आठवडा नाही झाला, चालले शिर्डीला. तिथे जाऊन ४ दिवस नाही झाले, की तुम्ही कसलासा मंत्र सुरू करता जपायला. तोही सातत्याने नाही; आणि मग ‘रिझल्ट’ नाही आला की तिसरा देव. अरे काय चालवलंय? ही रेल्वेची तिकिट विंडो नाही की जिथे कमी रांग दिसते तिथे उभं रहावं. किंवा आमची देवळं म्हणजे वेगवेगळी हॉटेलं नाहीत कि आज चायनिज खाल्लं, उद्या पंजाबी, परवा कॉंटिनेंटल, तेरवा ब्राह्मणी. लाईन अ‍ॅंड लेन्ग्थ सातत्यपूर्ण ठेवा की जरा."

"मला पटतंय देवा.... पण... आमच्या समस्या आम्हाला असं बिथरायला भाग पाडतात"

"अच्छा म्हणजे समस्या तुमच्या पेक्षा बलवान झाल्या तर. मग तुम्हाला दिलेल्या बुद्धी, आत्मविश्वास, विचार, समज, या गोष्टी कुठे हरवल्या? मुळात तुमच्या मनात आम्ही जो आमचा ३जी सॅटेलाईट फोन बसवलेला असतो. तो तुम्ही कधी डायलच करत नाही. कधी मनन, चिंतन करतंच नाही. काही झालं की लगेच आय एस डी फोन करायला नाहीतर चॅट करायला देऊळरूपी सायबर कॅफेत येता. असं नसतं रे करायचं. काही फीचर्स आम्ही आमच्या प्रत्येक मानवात इन्बिल्ट बसवलेली आहेत. ती फीचर्स वापरलीच नाहीत तर तुम्हाला तुम्ही कीती ‘केपेबल’ आहात हे कधीच कळायचं नाही. काही गोष्टी आम्ही आमच्या लोकल देवळांत डेलिगेट केलेल्या आहेत, तेंव्हा लगेच असे इशू एस्कलेट करायचे नाहीत. किंवा भांबावल्यासारखं वेगवेगळी देवळं हंट करत फिरायचं नाही. विश्वास ठेवायचा. संयम ठेवायचा. प्रोसेस चालू असते. अरे प्रोग्रॅम लिहिणं एक वेळ सोपं असतं पण त्यातला बग काढायला वेळ लागतो. इन्स्टंट नसतात सगळ्या गोष्टी. आणि फरक कसा आहे माहित्ये, आम्ही सगळे एक आहोत; आणि तुमच्या एकेकाला सगळे हवे असतो."

"मला खरंच सगळं कळलंय, समजलंय आणि पटलंय.... मी आणखी काहीच म्हणत नाही आता"

"हं ! तेंव्हा आता शांत रहा. चांगल्या गोष्टी करत रहा. तू इथवर आलास, तुझी केस एक्स्पिडाईट करतो मी. माझ्या म्हणण्याचा वाकडा अर्थ घेऊ नकोस. तुम्हा मानवांना कीड लागलीय असे गैरसमज करून घेण्याची. देवळात या तुम्ही; मला आवडतं तुम्हाला भेटायला. पण काही गोष्टी आपल्या ३जी सॅटेलाईट फोन वरूनच बोलंत जाऊ आपण. तो जास्त जलद आणि परिपूर्ण संवाद असतो. कळलं?"

"हो. (हसतो)"

"तथास्तू"

Monday, September 10, 2012

Addressing the troublers

This is for all the people who stay in the housing society where I reside, the kids who play there, scratch the cars, damage them in many other ways, their fathers who, instead of teaching them a lesson, protect them, their mothers, who keep mum altogether, their grandparents, who have not taught the right lessons about good and bad, true and false to their children when they were young and to every single person there.

To whomsoever it may ‘pinch’

I hereby wish to take this opportunity to thank you for providing me with another great example which has contributed to my belief that a person with ridiculous mentality is forever a person with ridiculous mentality. I appreciate your consistency in intentionally causing damage to the vehicles owned by my family. The damages have in fact polished my negative opinion about you.

I wish you all the very best for implementation of your further notorious plans. I pray to the God if it may so exist, that you shall get what you deserve in return of each of your acts. I also believe that this settlement shall happen in this very life of yours.

Thank You.

आरक्षण

अनुसूचित जाती जमातींना शिक्षणात आरक्षण झालं, महिलांना सगळीकडे आरक्षण झालं, आता ठराविक जातींना बढतीत आरक्षण म्हणतायत; 
असं ऐकलं मी की आणखी काही मंडळी आपापल्यासाठी आरक्षणाचे प्रस्ताव मांडणार आहेत. जसं,

जाड्या माणसांना सौंदर्यस्पर्धांमधे आरक्षण
नाचता न येणा-यांना नृत्यस्पर्धेत आरक्षण
गाता न येणा-यांना गायनस्पर्धांत आरक्षण
टक्कल असणा-या लोकांना शॅम्पूच्या अ‍ॅड्स मधे आरक्षण
दुचाकीधारकांना कार रेस मधे 

आरक्षण
सॉफ्ट ड्रिंक पिणा-यांना बार मधे आरक्षण....

...यादी खूप मोठी आहे.

अ. ज. ओक

Saturday, September 8, 2012

टी आर पी चा पूर !

‘क्या बात! क्या बात! क्या बात!’
‘चुम्मेश्वरी पर्फॉर्मन्स’
‘नाउ दॅट्स व्हॉट आय कॉल अ पर्फॉर्मन्स’
‘स्टुपेंडोफॅंटाब्युलसली फॅंटॅस्टिक पर्फॉर्मन्स’ (हे काय आहे चायला मला आजवर कळलं नाही)
आणि काय ते...
‘सँटाबाबाडा पर्फॉर्मन्स’ (मला लिहितानाही चीड येतेय. पण असो.)
‘परफेक्ट पर्फॉर्मन्स’ (नेने बाईंनी डिसेन्सी ठेवली)

डान्स शोंचं जे काय खूळ बोकाळलंय, त्या शो मधल्या विविध जजेस चे हे काही सिग्नेचर वाक्प्रचार. एखादा नाच आवडला की ते जज हे असं काहितरी म्हणतात आपापलं ठर(व)लेलं. आणि मग त्यांनी तसं म्हटलं की स्पर्धक एकदम देवाने कौल वगरे दिल्यासारखे खूश होतात. आणि मग अमूक अमूक जी से ‘क्या बात’ मिला ! वा वा वा वा ! असं अ‍ॅंकर कडून वाक्य येतं. स्पर्धक पुन्हा खूश. म्हणजे आधी ऐकलं नसावं अशाप्रकारे. मग जोडीदार स्पर्धकाला मिठी वगैरे मारायची पद्धत असते. त्याशिवाय तुम्ही खूश आहात हे लोकांना कळत नाही. काहीवेळा स्पर्धक जागच्या जागी ४ उड्या मारत ‘वू......’ असा एक कोल्हेकुई किंवा कुत्रेकुई सारखा आवाज काढतात.

हे असं प्रत्येक डान्स शो मधे होतं. मी सहज कल्पना केली की एखादा उलट्या डोक्याचा जज तिथे गेलाच तर, तो काय करेल. म्हणजे....  तो त्याला एखादा नाच आवडला की म्हणेल; ‘कचरा पर्फॉर्मन्स’ किंवा ‘गटार पर्फॉर्मन्स’ (इन अ‍ॅप्रिसिएशन बरं का). मग स्पर्धक ‘वू......’ अमूक अमूक जी से ‘गटार’ मिला.... वाव ! माइंड ब्लोइंग (हे पण एक नेहमी म्हणायचं असतं) !

पेपरात जे भविष्य येतं, त्यात कसं सगळ्या राशींना ४ चांगली वाक्य १ थोडंस चिंतेच किंवा सूचनेचं वाक्य असं साधारण मिश्रण करून प्रत्येक राशीचं भविष्य लिहिलेलं असतं. तसं या डान्स शो मधल्या कमेंट्स चं असतं. एक जज म्हणतो ‘आउट स्टॅंडिंग’ पर्फॉर्मन्स. सिर्फ आपको अपने एनर्जी पर और मेहनत करनी पडेगी. (म्हणजे काय?) दुसरा जज उलटं म्हणतो. तो आधी म्हणतो की मुझे आपका आज का पर्फॉर्मन्स इतना अच्छा नही लगा. (की स्क्रीन लगेच ब्लॅक अ‍ॅंड व्हाईट होतो). दोन वेळा ढॅं! ढॅं! असा आवाज येतो. पुन्हा सुरू. मग त्या स्पर्धकांचे चेहरे चिंताग्रस्त झालेले असतात. तो जज पुढचं वाक्य म्हणतो. लेकिन अमूक अमूक, जिस तरह से स्टार्ट टू एन्ड आपने जोश बरकरार रखा, मैं उसकी दाद दूंगा. (टाळ्या !)

हे असं चित्रविचित्र, चांगलं वाईट, खोटं खोटं, सगळं एक तास करायचं की टी आर पी चा पूर ! ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह्ड

Saturday, September 1, 2012

मराठी दैनिक साबण (डेली सोप) - भाग २

दैनिक साबणांनी दिवसेंदिवस आपला बार रेज करायचं सातत्य ठेवलंय. नवनवीन सिरियल्स, नवनवीन पात्रं (दोन्ही अर्थांनी), नवनवीन गोष्टी.


  • या सिरियल्स मधली आडनावं फार ‘सर’स असतात. सरनाईक, सरदेशमुख, सरपोतदार, सरनौबत अशी. हे ‘सर’ सध्या ट्रेंड मधे आलंय त्यामुळे. आपल्या नावाला ‘ग्रॅंड’ करायला लोकं आडनावाच्या मागे ‘सर’ लावू लागलीयत म्हणे. म्हणजे सरगोखले, सरकुलकर्णी, सरजोशी वगैरे.
  • पर्म्युटेशन कॉंबिनेशन च्या तत्वाप्रमाणे, कधी सिरियल मधला नायक गरीब असतो (तरीही मोबाईल, बाईक, कार, लॅपटॉप ही श्रीमंतीचा मापदंड असणारी उपकरणे त्याच्याकडे असतात) तर कधी नायिका गरीब आणि गावातून आलेली (तरीही फॅशन मधे मुंबईतल्या मुलीला फीट आणण्याची क्षमता असलेली) असते.
  • ‘क्षणात येते सरसर भरभर क्षणात फिरुनी ऊन पडे’ या कवितेतल्या ओळीप्रमाणे, सिरियलमधल्या कुटुंबात एक दिवस कोट्यांच्या व्यवहारांच्या चर्चा होतात आणि दुस-या दिवशी त्या लोकांना तीन चार लाखांची कर्ज घेण्याची पाळी येते. बरं या सगळ्या घटना होत असताना त्यांचं आलिशान घर, नव्हे वाडा, दागिने, या गोष्टी अढळ असतात.
  • बहुतांश सिरियल मधे नायक किंवा नायिकांच्या वडिलांचे ‘बिजनेस’ असतात ‘बिजनेस’. आणि त्यात अर्थातच त्या नायक किंवा नायिकेला एन्ट्री असते. त्यांच्या ऑफिसांमधे ते टाय, ब्लेझर वगैरे घालून जातात. आणि भर कॉरिडॉर मधे रस्ता स्टाईल भांडणं करतात (कॉलर वगैरे धरून). ही भांडणं होत असताना बाकी कर्मचारी एकमेकांकडे बघून ‘काय ना !’, ‘बघा ! असं चालतं’ असे हावभाव करत रहातात.
  • यातल्या नायक नायिका कधीकधी खूप धार्मिक असतात. सिरियल मधे मुंबई सारख्या शहरात सुद्धा साधारण एकटं, शांतं, जिथे गर्दी नाहीच असं देऊळ असतं. तिथे तो नायक किंवा नायिका जाते, धडा मोठ्याने वाचल्याप्रमाणे आपली इच्छा बोलून दाखवते. (बाजूला ‘तनहाई....’ पोज मधे बसलेले भटजी/गुरुजी ते ऐकत असतात.) मग एक फूल हमखास त्या मूर्तीवरून नायक/नायिकेच्या हातात किंवा पुढ्यात पडतं. ‘बिंगो’ ! ‘अ‍ॅप्रूव्ह्ड’
  • सिरियल्स हे फॅशन चं उगमस्थान आहे. साड्या, ड्रेस, मोठ्या टिकल्या, नेकलेस, कानातले, नाकातले.... डिझायनर्स चं हेच तर प्रेरणास्थान असतं.
  • या सिरियलचे डायलॉग रायटर खूप तणावाखाली असावेत किंवा गांजा पिऊन लिहीत असावेत. कारण डायलॉग ऐकून बघणा-याला किक बसते हो ! (किंबहुना द्यावीशी वाटते). देवळात कुणी भेटलं की प्रश्न येतो ‘इथे काय करताय?’ (शॉपिंग ला तर नाही येणार कुणी देवळात). किंवा हॉस्पिटल मधे दोन व्यक्तींची भेट होते आणि एक व्यक्ती दुस-या पेशंटला प्रश्न करते, ‘बरं नाहीये का?’
  • ‘एकमेका सहाय्य करू...’ हे आजकाल नवीनच बघायला मिळू लागलंय. नव्हे; सासू सुनेला सहाय्य करते वगैरे असलं काही नाही. एक सिरियल दुस-या सिरियल ला सहाय्य करते. म्हणजे नवीन सुरू होणा-या सिरियल ची नटी मावळत्या सिरियल च्या नटीची मैत्रीण (अचानक) बनून प्रकट होते आणि ‘आता मी तुम्हाला पिडायला येणार’ हे बजावून जाते. सगळ्या सिरियल त्यांच्या स्पॉन्सर्स ना सहाय्य करतात. मग त्यासाठी सिरियल च्या नायिकेला "‘लॉरियल’ चा हेअर कलर लाव; बघ तुझे केस किती छान होतील" असा डायलॉग मारावा लागतो.

एकूणच काय; सगळं कमर्शियलाईझ. सगळ्याचं व्यवसायिकरण. नट-नट्यांचं, प्रसंगांचं, भावनांचं, प्रेक्षकांचं, सगळ्याचंच. आनंदी आनंद !