Friday, August 10, 2012

एक्सेल एक्सेल

‘आम्हाला वगळा गतप्रभ जणु होतील कॉम्प्युटर; आम्हाला वगळा की पोरकी जणु होतील सॉफ्टवेअर’ मायक्रोसॉफ्ट ऑफिस च्या वतीने ही दर्पोक्ती. खरंच पण.. मायक्रोसॉफ्ट वर्ड, पॉवरपॉईंट, आणि विशेषत: एक्सेल; यांची जागा संगणक विश्वात कुणी घेऊच शकत नाही अशी परिस्थिती आहे. Irreplaceable, असा त्याला इंग्रजीत सुरेख शब्द आहे. अशी फार कमी कार्यालयं असतील की जिथे एक्सेल वापरलं जात नसेल. किंवा क्चचितच असा कॉम्प्युटर मिळेल ज्यावर मायक्रोसॉफ्ट ऑफिस नाही.



मला या एक्सेल बद्दल विशेष आकर्षण, कौतुक आणि विश्वास आहे. एक तर हे सॉफ्टवेअर मारुती च्या शेपटी सारखं किंवा द्रौपदीच्या साडी सारखं आहे. आटोक्यात आलंय वाटता वाटता वाढत जाणारं. तुम्हाला जेंव्हा वाटतं की ‘हं. मला आता एक्सेल मधलं सगळं येतं’ तेंव्हा तुम्ही चूकच असता. कारण यात अमर्याद गोष्टी करता येतात आणि त्या सगळ्या कदाचित त्याच्या निर्मात्यालाही माहीत नसाव्यात. मला त्याबद्द्ल इतकं कौतुक असण्याचं आणखी एक कारण म्हणजे सध्या मी करत असलेलं काम. माझ्या कामात या एक्सेल चा हत्तीचा वाटा आहे. म्हणजे सिंव्हापेक्षाही चौपट मोठा. आमचा दिवस सुरु एक्सेल ने होतो, आणि संपतो ही एक्सेल नेच. अर्थात तेच सगळं नव्हे पण तरीही. एक्सेल आमचा मिसळवणाचा डबा आहे. म्हणजे ना, स्वयंपाक करताना एखादी व्यक्ती कसं, कढई घेते, मिसळवणाच्या डब्यातून तिखट, हिंग, हळद, मसाला, जिरं, मोहोरी वगैरे जिन्नस ठराविक प्रमाणात घेऊन त्या कढईत टाकते आणि त्याच्यातून एक विशिष्ट चव तयार करते, तसं आम्ही एक फाईल घेतो, त्यात डेटा ओततो, मग ४-५ विविध प्रकारच्या फॉर्म्युलांचं मिश्रण करून त्यात टाकतो आणि ते सगळं ढवळून एक ‘रिपोर्ट’ बनवतो. त्याला पिव्होट टेबल रुपी ‘सर्व्हिंग बाउल’ मधे काढतो, फॉर्मॅटिंग वगैरे करून गार्निश करतो आणि मग विविध लोकांना ‘सर्व्ह’ करतो.

तर अशा या बहुगुणी सॉफ्टवेअर वर अर्थातच माझा खूप विचार होतो. आणि अर्थातच त्यातून अनेक कल्पना सुचत जातात. कधी अध्यात्मिक, कधी तात्विक, कधी पाप पुण्याच्या, किंवा कधी केवळ विनोदी. एकन्दरितच या एक्सेलंट अशा एक्सेल वर काम करायला फार मजा येते बुवा.

HAPPY EXCELLING !

2 comments: