ऑफिस म्हणजे काम. काम म्हणजे कंटाळा. कंटाळा म्हणजे विरंगुळ्याचा शोध. सर्वात सोपा विरंगुळा म्हणजे चहा/कॉफी. सर्वसाधारणपणे प्रत्येक ऑफिसमध्ये चहा कॉफीची सोय असते. आमच्याही आहे. साधं मशीन होतं आधी; आता आमचे लाड म्हणून ‘सीसीडी’ चं बसवलंय. त्याचं स्वागतही झालं बसवल्यावर. आहे; छान आहे.
पण सध्या एक नवीन डिस्कव्हरी झालीय मला. एक चहा कॉफी वाला आहे आमच्या ऑफिसखाली. तसा शक्यतो मी चहा कॉफी च्या वाट्याला जात नाही. ‘कधीच’ हा शब्द मी वापरत नाही, कारण अनेक कारणांमुळे अधे मधे माझं कॉफी/चहा पान होतं आजकाल. हां, तर तो चहा कॉफीवाला. त्याची थोडक्यात स्टोरी अशी आहे की तो एम८० ने आमच्या बिल्डिंग खाली येतो. एम८० बेसमेंट मधे पार्क करतो. तिथून घोडा सायकल घेउन बाहेर येतो. ही घोडा सायकल म्हणजे त्याचं दुकान. कॅरियर ला कॉफी चा ड्रम लावलेला, एका बाजूला एक पिशवी, त्यात डिस्पोजेबल ग्लास. हॅंडल ला एक पिशवी त्यात १ थर्मास, ज्यात चहा असतो. आणि रिझर्व ग्लास चा स्टॉक. इतकंच नव्हे, डोसा, उत्तप्पा, इडली, अशा साउथ इंडियन पदार्थांची मेजवानीही हॅंडल ला लटकवलेल्या पिशवीत असते.
पहिल्यांदा त्याच्याकडे गेलो तेंव्हाच लई खूश झालो. ५ रुपये द्यावेत, एक कॉफी असं सांगावं. एका झटक्यात बरोब्बर एक डिस्पोजेबल ग्लास तो काढतो, लयबद्ध असा ३ वेळा कॅरियर वर आपटतो. आपटता आपटता विचारणार, "सादा, कडक?". तुम्ही सांगावं, "कडक", की तो त्या ग्लासात एक छोटा चमचा अस्सल फिल्टर कॉफी घालणार, आणि ड्रम मधून ग्लासभर फिल्टर कॉफीचा ‘जाम’ भरणार. या सगळ्याच्या जोडीला मोबाईल वर लावलेली साउथ इंडियन गाणी जो रंग आणतात ना, तो और आहे. त्याचा चहासुधा जबरदस्त असतो बरं का, आलं आणि वेलची वाला. पण लिमिटेड एडिशन. एक थर्मास भर; बस.
तो मला खरोखर भावला त्या दिवशी मी खाली उतरलो आणि पाऊस आला. कडेकडेने मी त्याच्याइथवर गेलो. त्याने खुणेने मला समोरच्या दुकानाच्या शेडखालीच थांबायला सांगितलं. मी थांबलो. तो तिथवर त्याची छत्री घेऊन आला. मी आणि बाजूची २ माणसं, आमच्या ऑर्डर घेतल्या. मला विचारताना स्वत:च म्हणाला, "कडक ना?" मी होय म्हटलं. ५ रुपये देऊ केले, तर म्हणाला बादमें देना. गेला; कॉफ्या घेऊन आला. आम्हाला कॉफ्या दिल्या. आम्ही त्याचा आस्वाद घेतला. नंतर मी ग्लास त्याच्या इथल्या कचरापेटीत टाकायला जाऊ लागलो तर पुन्हा खुणेने मला थांबवलंन. माझ्याइथे आला, म्हणाला, "आप मत भीगो सर". माझ्याकडून ग्लास आणि १० ची नोट घेऊन गेला, ५ परत आणून दिले. इतकी सर्व्हिस ! कौतुक वाटलं मला ! धंदा म्हणून असेल तरीही इतकी सर्व्हिस कुणी देत असेल तर केवढं बरं वाटतं ! आणि तो मनापासून देतो ही सर्व्हिस.
या माणसाची वेळही ‘स्विस टाईम’ इतकी काटेकोर आहे. पहिल्याच दिवशी मी विचारलं तेंव्हा मला म्हणाला, "सुबह ८ से ११:२० और दोपहर ३ से ६ रहता हूं" एक दिवस ११:२१ झाले होते उतरायला तर मी या माणसाला पाठमोरं बघितलं. इतकं काटेकोर. एकंदरीत खूप वेगळा ‘अण्णा’ आहे तो. लई भारी.