Wednesday, March 28, 2012

टेलिमार्केटिंग - भाग १


डेलीमार्केटिंग; म्हणजे, मला म्हणायचंय की, ‘टेलिमार्केटिंग’ वाल्यांचे फोन आता इतके वाढलेत, की फोन या गोष्टीचा मुख्य उपयोग मार्केटिंग वाल्यांना आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आहे की काय, असं वाटायला लागलंय. या टेलिमार्केटिंग वाल्यांमधे अनेक प्रकार असतात, आणि त्यांना ‘फेस’ करण्याचे आपले अनेक प्रकार. असेच हे काही किस्से, या टेलिमार्केटिंग वाल्यांचे. काल्पनिक नाही बरं का, माझ्या या कानांनी ऐकलेल्या आणि या तोंडाने बोललेल्या गोष्टी.

आपण एखाद्या कामात असतो, विचारात असतो, किंवा एखादे वेळी नुसतेच निवांत पडलेलो असतो. आणि मोबाईल ची रिंग वाजते. (भ्रमणध्वनी, घंटी वगैरे शब्द मुद्दाम वापरत नाहीये, कधीकधी ते फार ओढून ताणून आणलेले वाटतात.) तर, मोबाईल ची रिंग वाजते. अनोळखी नंबर. एरवी ओळखीचा नंबर बघूनही चेहरा वाकडा करणारे अनेक जण या अनोळखी नंबरकडे बघून मात्र तो ‘ओळखीचा’ आहे का, हे आठवण्यात काही सेकंद घालवतात. उचलावा की न उचलावा, हो-नाही करत हिरव्या बटणाकडे अंगठा वळतो आणि फोन कानाला चिकटतो.

तिकडून अनेकदा एक अतिशय पसरट, फताडका आणि खरखरीत आवाज ऐकू येतो. "नमश्कार, क्या मैं अजय जी से बात कर रहा हूं?" किंवा, "गुड आफ्टरनून सर माय नेम इज पंकज आय अ‍ॅम कॉलिंग ऑन बिहाफ ऑफ ‘कितीबॅंक’..."
अजय ‘येस’ किंवा नुसतच ‘हं’ असं उत्तर देतो.
तोच आवाज पुढे म्हणतो, "हमारी कंपनी आपको एक बहोत अ‍ॅट्रॅक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट स्कीम ऑफर कर रही है सर जिसमें आपको मिलेंगे गॅरंटीड रिटर्न साथ ही साथ लाईफ कवर सर.."
अजय त्रासून, तरीही शांतपणे उत्तर देतो, "नही, सॉरी पंकज पर मैं अभी इन्वेस्ट्मेंट स्कीम्स में इंटरेस्टेड नही हूं."
पंकज विचारतो, "क्या मैं इसकी वजह जान सकता हूं सर?"
<यावरचं मनातलं उत्तर असतं "घरी जा रे!...">
"नही अभी मेरा इन्वेस्टमेंट करने का कोई इरादा नही हैं, मैं कर चुका हूं ऑलरेडी."
पंकज चालूच राहतो. बहुदा जेवढा उतारा पाठ केलाय तेवढा वाचून काढायचाच अशी बॉस ने ताकीद दिलेली असते.
"सर हमारी जो स्कीम है उसमें आप मंथली पे कर सकते है, आप को १०% रिटर्नस मिलेंगे और लाईफ कव्हर मिलेगा. आप अपने फॅमिली मेंबर्स को भी इसमें कव्हर कर सकते है और ये मार्केट रेट से १.५% ज्यादा रिटर्न आप को देगा..."
(पंकज ला मधेच तोडून)... "पंकज... आय सेड, मुझे अभी इन्वेस्ट्मेंट में इंटरेस्ट नही है."....
पंकज हट्टी ना;
"लेकिन सर आप इसके फीचर सुन सकते है बाद में आप डिसाईड कर सकते है"
अजय...."लेकिन मेरेको इन्वेस्ट ही नही करना है तो फीचर्स सुन के क्या करूं???"
<वैताग वाढला की मग ‘मेरेको’ वगैरे असे शब्द बोलण्यात यायला लागतात.>
पंकज ची कॅसेट रिवाइंड, "सर ये बहोत अच्छा स्कीम है सर इसमें आपको गॅरंटीड रिटर्न....। कट.

हे असं संभाषण माझं काही महिन्यापूर्वीपर्यंत व्हायचं. त्यानंतर त्यात थोडा बदल झाला; म्हणजे मी ‘केला’. तो असा.

....क्रमश:

No comments:

Post a Comment