Wednesday, August 21, 2013

डस्ट इन द विंड / Dust in the wind

काही माणसांची एखादी सवय, एखादा विचार मनात कायमचं घर करून राहतो. या व्यक्तीचंही असंच होतं. 'होतं' म्हणताना वाईट वाटतंय, कारण त्याचं जाणं अगदीच अनपेक्षित होतं. आमच्या बाजूच्या कॉलनीत हा भाजीवाला गेले अनेक महिने भाजीची गाडी लावायचा. जाहिरातींवर कोट्यावधी खर्च करूनही मोठाल्या दुकानात चार दोन टकलीच फिरकतात अशा काळात याच्या भाजीच्या गाडीवर संध्याकाळी  तो असेस्तोवर सतत गर्दी असायची. सेल, डिस्काउंट ही गर्दीची कारणं नव्हती. त्याचे युएसपी होते, त्याचा हसरा चेहरा, अगत्य, आपुलकी, आणि त्याने जपलेलं एक सात्विक माणूसपण.
माझ्या मते कॉलनीमधल्या सगळ्या ताया, आया, मावश्या, आज्या त्याच्याकडून नियमित भाजी घ्यायच्या. 'तुम्हाला काय देउ ताई?','जरा एक मिनिट हं आजी.. देतोच', 'आलं देऊ ताई, ताजं आहे मस्त, बघा चहात घालून', 'कोथिंबीर अत्त्ताच संपली दादा :(, आणि काय देऊ? भेंडी घेता, छान गावठी आहे'     प्रत्येकाशी, अगदी प्रत्येकाशी तो असंच प्रेमाने बोलायचा. मीही त्याच्याकडून अनेकदा भाजी घेतलेली आहे. एकदा त्याने मला मी घेतलेल्या लिंबांबरोबर, भरपूर कढीपत्ता असाच, मोफत देऊ केला होता. मी चार चार वेळा विचारलं होतं, 'काही नाही? नक्की?'. त्याने हसत ' काही नाही दादा' म्हटलं होतं.
वाईट माणसं त्यालाही भेटली. माझ्या आईच्या समोर एका बाईने अर्धा किलो टोमॅटो घेतले. आणि त्याने ते दिल्यावर दोन आणखी उचलून पिशवीत टाकले. त्यानेही ते बघितलं होतं, पण तरीही तिला तो सगळ्यांसारखं 'बरंय ताई' असंच म्हणाला आणि तसंच हसत म्हणाला. मग माझ्या आईला म्हणाला, 'कशी असतात बघा ना लोकं! काय करणार.' इतकं चांगलं कसं वागू शकायचा तो, मला खरंच प्रश्न पडायचा, पडतो. अशी माणसं फार दुर्मिळ असतात.
'त्याचे बाबा मोठ्या मार्केटात भाजी विकायचे, तू लहान असताना आपण नेहमी त्यांच्याकडून बटाटे घ्यायचो', आई मला त्याचे संदर्भ सांगत होती. पण तो गेला, हे ऐकून मला फार जास्त वाईट वाटत होतं, त्यामुळे मी त्याच विचारात होतो. कसा गेला, तर, तापाने. अंगावर काढला असणार. करेल तरी काय, पैसे कुठे असतील इतके त्याच्याकडे डॉक्टरांना द्यायला. असे अनेक विचार तेंव्हा माझ्या डोक्यात येत होते. Yet another 'good' person goes out of this world. धक्का बसला होता. 'पर...वा घेतलेली यार भाजी त्याच्याकडून...' मी म्हटलं, 'किती अकस्मात आहे हे!..' विचार थांबेना. पण पुढे दिवस सरत गेला. नेहमीची कामं होत राहिली. आणि नकळत या गोष्टीचा विचार मागे पडला.

चार दिवसानंतर मी असाच सकाळी गाडीने ऑफिसला चाललो होतो. ईद चा दिवस होता. माझ्या ऑफिसला नसली तरी ब-याच ऑफिसांसाठी ती सुट्टी होती. रस्ते रिकामे होते त्यामुळे गाडी चालवायचा निखळ आनंद मिळत होता. निवांत एका स्पीड ला गाडी लावून धरली होती. स्टिरिओ वर मला आवडणारी, 'कंट्री साँग्स' लागली होती. आणि हे गाण लागलं. कन्सास बँड चं, 'डस्ट इन द विंड'. चार ओळी ऐकताच मला तो भाजीवाला, त्याचा हसरा चेहरा, त्याच्याबरोबरचं माझं एक अन एक संभाषण, त्याचं जाणं, सग्गळं धडाधड मनाच्या प्रोजेक्टर वर फिरायला लागलं.  'ऑल वी आर इज डस्ट इन द विंड'... ही गाण्याची ओळ कानात घुमायची, आणि मनात असंख्य विचार. एकट्याने गाडीतून जाताना असाही मी गाण्यांची विजेरी घेऊन स्वतःला शोधत असतो. आज हा विचारही सोबत होता. पुढे थेट ऑफिस आलं एवढंच माहिती आहे; कारण दरम्यानच्या काळात मी याच 'ट्रान्स' मधे होतो.

Tuesday, July 30, 2013

रायगड ट्रेक | Fort Raigad Trek

तीर्थक्षेत्री जाण्यासाठी योग यावा लागतो म्हणतात. तसंच काहीसं झालं. ट्रेकिंग ची, गड किल्ल्यांची आवड लागून दोन वर्ष झाली परंतु दुर्गदुर्गेश्वर रायगड ला जाणं झालं नव्हतं. खरं तर जून मधलाच हा प्लॅन होता. पण एक नाही दोन वेळा पुनर्नियोजित झाला होता. शेवटी तो योग आला. रायगडास जाणे झाले, शिवतीर्थाची भेट झाली.
रायगड ट्रेक योजला. तिघांची टीम जमली. आमच्यासोबत पहिल्यांदाच येत असलेला, पण आमचा शाळेपासूनचा मित्र असलेला, आणि आमच्या तिघांपैकी खरंच 'शिवभक्त' असलेला अनिकेत. चढवय्ये च्या फाउंडर मेंबर्स पैकी एक, ट्रेकला जाण्यासाठी सदा उत्साही असणारा, विनोदभूषण, रॉकपॅच चा राजा, स्वानंद; आणि मी.
दुपारी अकरा वाजता निघायचं ठरलं होतं. त्यानुसार आरामात उठलो, आवरून बॅग भरली. घाईघाईत, सर्वसाधारण आणि विशेष आवडी-निवडी लक्षात घेऊन, चार एक जीबी ची गाणी पेनड्राईव्ह मधे भरून घेतली. सॅक च्या वजनात या वेळी आम्ही नव्यानेच घेतलेल्या तंबूची भर होती. सुमारे साडेचार किलोचा अतिरिक्त भार.तिघे भेटलो आणि 'लेगसी कंटिन्यूज' ऑल्टो ची चाकं गरगरवली तेंव्हा साडे अकरा वाजले होते. मी आधीच गूगल गुरुजींकडून नकाशे घेतले होते आणि रस्ता मनात ठरवला होता. ठाणे-वाशी व्हाया पामबीच - खालापूर व्हाया एक्सप्रेस - खोपोली - पाली - पाचाड. पेण वडखळ चा सग्गळा ट्रॅफिक याने लागणार नव्हता. त्यानुसार निघालो. गाडीत फ्युएल होतं पण आमचं काय! मग दत्ताचा प्रसाद घेऊ म्हटलं. मिसळ, वडापाव, खरवस असं सगळं पोटात भरलं आणि विनाथांबा पाचाड ला देशमुख हॉटेल समोर गाडी लावली. पाच वाजून गेले होते. देशमुखांकडे न्याहारी केली, पुढे पायथ्याशी गाडी पार्क केली आणि सामान पाठींवर लादून पाय-या चढू लागलो.
स्वराज्याच्या राजधानीला जायची ओढ इतकी होती की काही मिनिटातच आम्ही ब-याच पाय-या चढलो. पण मग भाता वाजायला लागला होता. त्यामुळे दमाने घेत, बेताच्या वेगाने पुढे चढणं सुरू ठेवलं. एखाद्या पदार्थावर मिरपूड शिंपडावी, किंवा मीठ शिंपडावं, तसा पाऊस पडत होता, आणि आमच्या ट्रेक ची चव वाढवत होता. सद्ध्या पावसामुळे एक सुप्पर धबधबा गडाच्या वाटेवर कोसळतोय. तो ओलांडला. पुन्हा काही वेळाने तोच धबधबा आडवा आला. 'भिजा की...' असं म्हणाला. 'येताना नक्की' असं त्याला आणि एकमेकांना म्हणून तो दुस-यांदा ओलांडला. हा धबधबा तीन वेळा गडाच्या वाटेला छेदून जातो. काहीवेळाने वर बघतो तो महादरवाज्याबाजूचे दोन भव्य बुरूज दृष्टीस पडले. त्यांना बघून मला किल्ल्याच्या भव्यतेची कल्पना आली. विशाल बुरूज आणि महाराजांच्या सगळ्याच गडांप्रमाणे त्यात 'दडलेला' महादरवाजा दिसला आणि आम्हाला एक वेगळाच आनंद झाला. रायगड हा आदर्श स्थापत्यकलेचा नमुना आहे असं विधान आप्पा परबांनी त्यांच्या पुस्तकात केलंय; त्याच्या वैधतेची प्रचीती यायला सुरुवात झाली.
पुढे अर्ध्या तासात आम्ही एका पत्र्याच्या शेड जवळ पोचलो. ती जिल्हा परिषदेची रहायची व्यवस्था होती. ती फुल्ल असणार याची आम्हाला कल्पना होतीच. पण तरीही तिथल्या एका व्हरांड्यात आम्हाला राहता येईल का ते विचारलं. त्याला तिथल्या माणसाने होकार दिला. मग आणखी पुढे व्यवस्था शोधण्यास जायची गरज नाही यावर एकमत केलं आणि आम्ही त्या शेड मधे प्रवेश केला. खरं न वाटावं इतकं अचूक टायमिंग साधून पावसाने कोसळायला सुरुवात केली. 'बरं झालं अजून पुढे नाही गेलो' असं म्हणत असतानाच मातीमिश्रित पाण्याने ओल्या झालेल्या त्या जमिनीवर बसण्याचीही सोय नाही, तर झोपायचं कसं? हा प्रश्न आम्हाला पडत होता. तंबू लावायचं ठरवलं. एव्हाना मिट्ट काळोख झाला होता. आसपास ४-५ ट्रेकिंग ग्रूप्स आलेले होते त्यामुळे गजबज होती. खालच्याच देशमुखांचं वरतीही खाण्याचं हॉटेल आहे. तिथे राईसप्लेट जेवलो. दमल्यावर सगळंच छान लागतं, म्हणून नाही, तर जेवण खरंच चांगलं होतं, त्यामुळे जेवल्यावर छान वाटलं. मग भिजतच त्या शेडमधे परतलो.
तंबू उभारला आणि मग आम्हाला जो दिलासा मिळाला, तो औरच होता. कपडे बदलून, फ्रेश होऊन तंबूत शिरलो, टेकलो आणि निद्राराधना करू लागलो. स्वानंद ला अत्यानंद झाल्याने त्याची ब्रम्हानंदी टाळी लागायला वेळ लागला नाही. मी आणि अनिकेत आपले गप्पा मारत पडलो होतो. हळूहळू डोळे मिटू लागले. रात्रभर झोप म्हणावी अशी लागलीच नाही. गड बघायची उत्सुकता आणि पावसाने चालवलेला थयथयाट; त्यात झोपणं स्वानंदच जाणे. मधूनच तंबूच्या बाहेर दोन उभे कान असलेली बॅटमॅन सदृश सावली मला जागं करी. एक दोन वेळा हाताने ढोसून मी त्या कुत्र्याला बाजूला केलं, पण बिचारा कुडकुडत पुन्हा येऊन बसत होता, मग विचार केला, की जाउ देत, झोपू दे त्यालाही तंबूला टेकून. पत्र्यावर पाऊस अक्षरशः मशीनगन सारखा वाजत होता. अव्याहत. त्यात वारा. त्यामुळे छोटे मोठे दगड येऊन पत्र्यावर आदळत होते आणि आम्हाला जागं करत होते. उद्या सूर्यदेवाचं, गडाभोवतीच्या परिसराचं, किंवा आकाशाचं दर्शन होणं कठीण आहे ही कल्पना ढगांसारखीच दाट होत होती. सहा वाजता 'निळा प्रकाश दिसतोय, उठ' अशी अनिकेत ने हाक दिली. प्रकाश होता असं नाही, पण अंधार नव्हता. तंबू आवरला, तयार झालो, बॅगा पॅक केल्या आणि देशमुखांकडे चहा पिऊन गडफेरीला निघालो.
गडाबद्दल मी काय आणि कसं सांगू हे मला कळत नाहीये. इतका ग्रँड, प्रचंड विचार करून, आणि सूक्ष्मात सूक्ष्म गोष्टी ध्यानात ठेवून बांधलेला गड मी आधी बघितला नव्हता. रायगडात ख-या अर्थाने स्वराज्याचं सार आहे असं मला वाटतं. गंगासागर तलावाच्या बाजूने आम्ही सुरू केलेली फेरी पालखी दरवाजा, राणी महाल, स्तंभगृह, सचिवालय, महाराजांचा राजवाडा, टांकसाळ, दरबार, धान्यकोठार, होळीचा माळ, बाजारपेठ, अशी ठिकाणं बघत कशी रंगत गेली आम्हालाच कळलं नाही. प्रत्येक वास्तू अंगावर काटा आणत होती. मेघडंबरी मधे महाराजांच्या मूर्तीकडे बघताना मी कधी माझ्यात हरवलो मलाच कळलं नाही. वर्णन करण्यापलिकडची ती गोष्ट होती. 'किल्ले रायगड स्थळ दर्शन' या आप्पा परबांच्या पुस्तकात नोंदलेली १०० च्या वर ठिकाणं तर आम्ही बघू शकलो नाही. पण त्या पुस्तकात ती वाचली आहेत त्यामुळे पुढच्या खेपेस ती बघूच. तसंही हा किल्ला म्हणजे परत परत येण्याची जागा आहे हे इथे येण्या आधीच मनाशी ठरवलेलं होतं.
अनिकेत ला मेघडंबरी मधल्या महाराजांच्या पुतळ्याजवळ काही काळ घालवायचा होता. त्यामुळे तो तिथे थांबला, व मी आणि स्वानंद पालखी दरवाज्याच्या आसपासची काही ठिकाणं बघायला गेलो. नंतर तिघे मिळून टकमक टोकाकडे निघालो. जसजसे टकमक च्या जवळ जात होतो, तसतसा वारा वाढत होता. रेलिंगच्या कडेकडेने टकमक टोकावर पोचलो. ३-४ जणांनी तुम्हाला ढकलावं, साधारण इतका वा-याचा जोर होता. त्यामुळे रेलिंग ला धरूनच उभे होतो. टकमक बघायला दिसत काहीच नव्हतं. थोडा वेळ वारा आणि ढगांचा रौद्र खेळ अनुभवला आणि ट्रेक मधल्या त्या सर्वोत्तम स्थळावरून मागे फिरलो.
परत आलो तेंव्हा जवळपास एक वाजला होता. बॅगा उचलल्या आणि गड उतरायला सुरुवात केली. ठरल्याप्रमाणे मी आणि अनिकेत ने धबधब्याचा मान राखला. स्वानंद ला त्यात फार रस नसल्याने त्याने बाजूलाच उभं रहाणं पसंत केलं. सुमारे दीड तासात आम्ही परत गाडीजवळ येऊन पोचलो. गाडी देशमुखांकडे थांबवली. झुणका भाकरी वर ताव मारला. तृप्त झालो. आणि महाराजांना मनोमन वंदन करून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.

एक अफाट अविस्मरणीय ट्रेक केल्याचं समाधान होतं. पाउस वा-याचा धुडगूस, बोचरी थंडी, ढगात हरवलेले तिथल्या इमारतींचे अवशेष, तिथे क्षणोक्षणी जाणवणारा शिवाजी महाराजांचा वास, या सगळ्यांनी आमची मनं भरून गेली होती. या आणि जुन्या ट्रेक च्या आठवणी काढत घर कधी गाठलं कळलंच नाही. पण रायगड ला पुन्हा लवकरच जाऊ हे मात्र आम्ही एकमेकांना अच्छा करताना पक्कं केलं.

Tuesday, July 23, 2013

My Dream Road Trip

My Dream Road Trip. A thought that would excite me more than a jackpot win. Having been lucky enough because of my parents who bought a car just after I turned 18, I enjoy driving like anything. So much so that a good long drive can cure me of anything; just about anything.


To think of my 'Dream Road Trip' with that level of interest in driving, travel, and going places, is so difficult. Simply because I get a hundred ideas when I think of it; and all are equally exciting. But that's the beauty of it. It is different from reading the brochure of a Travel Company and planning where to go. It’s the brochure of your own little mind. It just gives you a world of compelling options.

Likewise, I have a hundred dream road trips in mind. But with a lot of effort, I could prioritize them. Now I have this trip at the number one position. A trip to Leh-Ladakh. The place has always fascinated me of its beauty, its peaceful water bodies, tall towering mountains, chilled fresh air, and winding roads.

Mumbai, the place where I live is exactly opposite to that. A dense concrete jungle, dirt and garbage on every corner of the roads, extremely noisy places, tall towering buildings, polluted air, and a lot of things to complain about. Still, it is the brain of India. My dream road trip starts from here. Traveling through the states of Majestic Maharashtra, Grand Gujarat, Royal Rajasthan, Pure Punjab, and Hilly Himachal, I wish to reach the place where the heart of India is; The Himalayas; Leh-Ladakh.

It is unlikely that a person who loves driving is not crazy about cars. I am no exception. I love cars. My dad's Maruti 800, which is not with us anymore, will always be my first love. That car taught me driving, and made me love it. I miss her. A Dream Road Trip has to be done in the Dream Car. I have a hundred names qualifying for the title of my 'Dream Car' but I have one that shines over them all. Surprising for some it might be, but the car that I would want to do my Dream Road Trip in, is Tata Sierra. No other car has been such a head turner for me. Tata Sierra stole my heart at first sight. Tough, elegant, powerful, luxurious and more importantly, my favorite.

I do not have many friends. I have a few who are good friends; and fewer 'very good' ones. My wife tops them all. She is, my companion wherever I go. Although; I love to travel alone and be with myself; for my Dream Road Trip, in the Dream Car, I would want the person of my Dreams to be with me, my wife.

This road trip will take me through many villages, many cities, where I will stop to just close my eyes and feel the air. Smell the soil. I will talk with many people that I will meet on the road, while drinking hot tea at a roadside tea-stall, at dhaabas, or anywhere during the journey. I will exchange thoughts, ideas, and emotions. And after many hundreds of kilometers of the journey, I shall reach my destination. After a lot of driving, talking, listening and feeling; shall I reach the point in time when I will do what I would have come there to do. I will turn the engine off. I will lie down on the lake shore, spread my hands wide, stare at the blue skies before slowly closing my eyes, to feel myself. That will be the paramount point of my trip. I will feel myself; I will rejuvenate, re-gather, rediscover, and recharge myself. The transition from the city life to village life to hills and then to this heavenly place shall feel like; a life.

I would wish then, if time could halt there itself, at that very point. Knowing that it will not; I will still embrace the moments to treasure them forever, as that will be a Dream which would have Come True.

Tuesday, July 9, 2013

लोहगड ची जत्रा | A crowded 'Lohagad Fort'

लो. ह. गड - लोकांमध्य॑ हरवलेला गड.

परवा लोहगडाच्या जत्रेला गेलो होतो. दुस-यांदा. पहिल्यांदा गेलो होतो ते मागच्या वर्षी. पावसाळ्याच्या नंतर. पण ती जत्रा नव्हती. तेंव्हा त्याचं ते हिरव्या गार रंगात नटलेलं रूप बघून, चिलखती, दणकट असं रूप बघून भारावून गेलो होतो. खूपच रंजक झाली होती ती भेट. दुस-या भेटीचा अनुभव मात्र वेगळा होता.

आम्ही पोहोचलो तेंव्हा प्रथमदर्शनी दिसली ती केवळ गर्दी. एक क्षण वाटलं की आपण बार मधे वगैरे आलो आहोत की काय!, कारण दारूच्या बाटल्या हातात घेऊन टोळकी वावरत होती. मग वाटलं की आपण पार्टीत वगैरे आलो असू, कलकलाट, स्टीरिओज चा ठणाणा, चाललेले अश्लील नाच, आणि पैशाचं, त्याच्या माजाचं मांडलेलं प्रदर्शन; हे सगळं पार्टीतच असतं ना?

या संभ्रमातच आम्ही गर्दीतून वाट काढत पुढे निघालो. पायाला दारूच्या, पाण्याच्या बाटल्या, चिप्स ची पाकिटं, या गोष्टी लागत होत्या ख-या, पण त्याक्षणी त्यावर भाष्य करण्यात काही अर्थ नव्हता. गर्दीतून ढोसाढोशी करतच आम्ही गडाच्या मुख्य दरवाज्यावर पोहोचलो. आम्ही ढोसाढोशी केली तो नाईलाज होता, पण तिथे आलेल्या बहुतेकांचं तेच उद्दिष्ट होतं
 

गडावर आल्यावर प्रथम डावीकडे गेल्यावर अष्टकोनी तलाव लागला. तलावाचा सार्वजनिक स्विमिंग पूल झाला होता. लोकं उड्या मारत होते, एकमेकांना ढकलत होते, किंचाळत होते, लक्ष वेधण्यासाठी जमतील ते चाळे करत होते. काहीकाळ त्या चाळ्यांत हरवलेला तो तलाव न्याहाळून पुढे निघालो. दर्ग्याच्या बाजूने चालताना दर्ग्यात बघितलं तर तिथे चार-दोन टकली एकाट बसली होती. गर्दुल्लेच वाटत होते. त्यामुळे तिथे जाण्याची इच्छाही झाली नाही. मग इमारतींचे अवशेष बघत विंचू काट्याकडे जात होतो. ढगाने अवघा परिसर वेढला होता. २० फुटापलिकडे काहीही दिसत नव्हतं. पण गर्दी मात्र चिक्कार होती आणि ती ऐकू येत होती. विंचू काटा दिसणं तर अशक्य होतं. त्याच्या काहीसं आधी एक छोटासा कातळातला उतार आहे. तिथे निसरडं होतं त्यामुळे पुढे फारसं कुणी जात नव्हतं. पण त्या 'स्पॉट' वर फोटो काढण्यासाठी झुंबड उठली होती.





फिरून लक्ष्मी कोठीजवळ येऊन ५ मिनिटं शांत विसावू म्हटलं, आणि त्या दिशेने निघालो. लक्ष्मी कोठी नजरेस पडली. आणि तत्क्षणी त्यातून एक इसम बाहेर पडला, हातात काळी प्लॅस्टिकची पिशवी घेऊन. रिकाम्या दारूच्या बाटल्या असाव्यात. ती पिशवी त्याने सर्रळ वरून खाली धुक्यात टाकून दिली. माझ्याशी नजरानजर केली. आणि पुन्हा आतून ऐकू येणा-या कलकलाटात सामील झाला. इथे आणखीच कुठली तरी 'कोठी' आहे असं वाटलं. 'लक्ष्मी' असं तिथे वाचून हळहळ वाटली. पुढे तिथे थांबण्यासारखं काहीच नव्हतं.
निराश होऊनच पाय-या उतरू लागलो. गणेश दरवाज्याच्या जवळ असलेल्या दीप लावायच्या खोबणीत चार टपराक मुलांचा जर्दा-मावा बेत चालू होता. तंबाखूत काहीतरी कालवत होते ते. काय ते कळलं नाही पण पिठीसाखर नक्कीच नव्हती ती. अर्थातच दुर्लक्ष करून मार्गस्थ झालो. उतरताना पाय-या जरा निसरड्या झाल्या होत्या. तिथे 'केवळ चार जणांना सांगायला एक स्वकर्तृत्वाची गोष्ट असावी' म्हणून ट्रेकिंग (अर्थात जाणकार म्हणतीलच इथे, की हे काय ट्रेकिंग आहे? ट्रेकिंग करायचं तर इथे इथे चला.... असो.) करायला येणा-या लोकांचं, विशेषत: मुलींचं/बायकांचं आउच्-उफ्फ चालू होतं, आणि त्यांना इथे आणणा-या मुलांची/माणसांची त्यांना हात देण्यासाठीची धडपड चालू होती. (का? ते आपण जाणताच)
 

चिंब भिजलेल्या अवस्थेत, रिमझिम पावसात मस्तपैकी गरमागरम मसालेदार मक्याचं कणीस खायची मजा औरच. ती मजा घ्यायला एका मावशींच्या टपरीवर गेलो. तिथे 'चुलीतल्या कोळशावर सिगारेट पेटवण्याची मजा काही औरच' म्हणणारं एक टोळकं आलं. चुलीवर सिगारेटी पेटवून आपले माकडचाळे तिथल्या माकडांना दाखवू लागलं.

तिथे एक बोर्ड लावला होता कुण्या वनखात्याने की इतिहास संवर्धन खात्याने. त्यावर लिहिलं होतं, की कचरा करू नका, इतिहासाचं रक्षण करा नि काय काय. त्या माकडचाळे करणा-या टोळक्याने आपली सिगारेटची थोटकं त्याच्च बोर्डाखाली टाकली. माझ्या उद्विग्नतेला कळस चढला. आणखी काही बघायची इच्छा उरली नव्हती. 'लोहगड संपलाय. आता हा एक पिकनिक स्पॉट आहे.' असं माझ्याशीच मी म्हटलं. सिंहगड; रायगड; कळसुबाई; राजमाची; आता लोहगड... अशी एक एक ठिकाणं आपल्यासाठी वर्ज्य होत जातील असं वाटतंय आता. मी ऐकलंय की हरिश्चंद्रगडही पाचनई च्या वाटेने कुण्णीपण करू लागलंय. माझ्यासाठी ड्रीम ट्रेक आहे तो. त्याचा लोहगड व्हायच्या आत तिथे जाऊन आलं पाहिजे बाबा.

Thursday, June 13, 2013

पेठ ची भेट (कोथळीगड ट्रेक) | Fort Peth (Kothaligad) Trek

२०१३ च्या पावसाळ्याची चाहूल लागली आणि ट्रेक चे बेत ठरायला लागले. फोनाफोनी, मेलामेली नको त्यापेक्षा प्रत्यक्षच भेटू असं ठरलं. आमच्या ‘चढवय्ये’ नावाच्या ट्रेक ग्रूप मधले फाउंडर आणि नियमित सदस्य असे आम्ही भेटणार होतो.


त्याप्रमाणे मी, प्रसन्न आणि स्वानंद एक दिवस भेटलो, पुढच्या सहा महिन्यातले ट्रेक्स ठरवायला. सी सी डी मधे आमची ही भेट रंगली. एकदम कॉर्पोरेट स्टाईल मधे कॅलेंडरं, डाय-या आणि पेनं काढली. तिथल्या वायफाय ची आयमाय झाली होती त्यामुळे जीपीआरएसचाच आधार घेऊन रिसर्च सुरू केला. सुमारे १०-१२ किल्ले आधीच यादी करून आणले होते त्यामुळे त्यातील एक एक नाव, काठिण्य पातळी, लागणारा वेळ, आणि जाण्याची उत्सुकता या निकषांच्या आधारे कॅलेंडरवर मांडलं. मोहीम जंगी ठरली. सुरुवात कशाने? तर जवळच असलेला, त्यातल्या त्यात सोपा म्हणवला गेलेला असा पेठ चा किल्ला. म्हणजेच कोथळीगड!



कर्जत पासून सुमारे २० किमी अंतरावर आंबिवली हे किल्ल्याच्या पायथ्याचं गाव आहे. कर्जत मुंबईपासून लोकल ने जोडलेलं असल्याने लोकलनेच जाऊ यावर एकमत झालं. कर्जत वरून जामरूख च्या एसटी ने तिथे जाता येतं. पण आम्ही बसवर अवलंबून न रहाता टमटम ने जायचं असं आधीच ठरवलं. मग काय! एसएमएस, फेसबुक, फोन या माध्यमातून चढवय्यांना निरोपरूपी आमंत्रणं धाडली. हो नाही करता करता साधारण ८ जण येतील अशी शक्यता वाटू लागली. आकडा ८ ते ५, ५ ते २, आणि २ ते ४ असा बदलला, आणि कहानीत ट्विस्ट आला. लोकलची जागा ‘लेगसी कंटिन्यूज...आल्टो’ ने घेतली. निघण्याची वेळ ४:३० वरून ५ झाली. डन !

फायनल टीम अशी झाली:- आमच्या ग्रूपमधला अ‍ॅंग्री यंग मॅन, म्हणजेच प्रसन्न उर्फ काका. कुठल्याही ट्रेक ला एव्हर रेडी असलेला, परेश; माफ करा, ‘द परेश’ उर्फ आमचा लोहपुरुष. या वेळी आमच्यासोबत पहिल्यांदाच येत असलेला चिंचवडचा निलेश. आणि मी.

आदल्या दिवशी ऑफिसमधे अंमळ उशीरच झाला. घरी आलो ते जवळजवळ जेवणाच्या वेळेला. एक दिवसाचा ट्रेक असल्याने फार तयारी नव्हती करायची, पण तरीही माझी घाई चालू होती. सॅक मधे कपड्यांचा जादा जोड, विंडचीटर, जुजबी क्रीमं, गोळ्या, ग्रूप मधे फेमस झालेले सुवासित टिश्यू, सर्च लाईट आणि कॅमेरा असं सामान भरलं. आणि शार्प पाच वाजता गाडीला स्टार्टर दिला. काकांकडे पोचायला मला ५:४५ वाजले. आणि कहानीला आणखी एक ट्विस्ट आला. पोलिसांना चकवा द्यायला हिंदी सिनेमातले गुंड जशा गाड्या बदलतात, तशी आम्ही आमची गाडी ऐन वेळी बदलली. आता आमचं वाहन होतं व्हाईट स्टॅलियन वेर्ना.

लोहपुरुषाला पिकप केलं तेंव्हा ’मी फार कॅज्युअल वाटत नाहीये ना?’ या त्याच्या प्रश्नातलं गूढ आम्हाला कळलं नाही. आम्ही एक साधंसं उत्तर देऊन त्याला बगल दिली आणि निघालो. डोंबिवली ते कर्जत हा गाडीसाठी अतिशय खडतर असा प्रवास करायला तासभराहून जास्त वेळ लागला. रस्ता प्रचंड वाईट आहे. बदलापूर नंतर ठीक आहे परंतु तिथपर्यंत .... कठीणच. चौथा गडी, निलेश, चिंचवडहून येऊन कर्जत ला आम्हाला भेटणार होता. कर्जत स्टेशन वर मी त्याला पिकप केलं, आणि स्टेशनाबाहेर आलो. ‘वडे चांगले मिळतात इथे!’ चारी माना डोलल्या, पुन्हा आम्ही दोघं स्टेशनात गेलो आणि ५ वडापाव ४ वडे असं फ्युएल घेऊन आलो. ट्रेक मधे नव्यांच्या जुन्यांना, आणि जुन्यांच्या नव्याने ओळखी व्हायला वेळ लागत नाही. वडापाव संपेपर्यंत आमच्यामधला ‘ओळख’ नावाचा ‘ओपन’ अ‍ॅक्शन पॉइंट ‘क्लोज’ झाला होता. गाडी आंबिवलीच्या दिशेने सुटली. चाळीस एक मिनिटात आंबिवली टच्च केलं. पायथ्याच्या हॉटेल कोथळीगड मधे चहा प्यायला आणि तिथेच व्हाईट स्टॅलियन ला पार्क करून निघालो.

हॉटेल कोथळीगड च्या बाजूनेच किल्ल्याची वाट सुरू होते. ही वाट सुमारे १० फूट रूंद असून चढाची आहे. वाट समतल नसून दगड गोट्यांची आहे त्यामुळे चालणं जरासं कठीण होतं. काही मीटर चालल्यावर एक वाट मुख्य रस्त्याला सोडून डावीकडे वळते. त्या वाटेने जावं. आम्ही दोन तीनशे मीटर चाललो असू, आणि एवढ्यातच सगळे घामाघूम झालो. श्वास धडधडत होते. रूंद रस्ता असला तरी चढाचा असल्याने अपेक्षेपेक्षा जास्त दम लागणार आहे हा अंदाज आला. ढगांचं दाट छप्पर अवघ्या परिसरावर पसरलं होतं पण पावसाचाच काय वा-याचाही लवलेश नव्हता. त्यामुळे दमछाक होण्यात अजून भर पडली. सुमारे ४ किमीचा हा असा रस्ता पार करून पेठ ला जायचं होतं.



आता लोहपुरुष रंगात येत होता. जिथे आम्हा सर्वसामान्यांना दरी दिसत होती तिथे याला शॉर्टकट दिसत होते. ‘अरे इथून चला इथे शॉर्टकट आहे!’ असं तो म्हणाला की आम्ही तिघे एकमेकांकडे बघायचो आणि पुढे चालायला लागायचो. एक वेळी म्हटलं बघू तरी काय म्हणतोय हा. मग एका ठिकाणी आम्हीही त्याच्याबरोबर पुढे सरसावलो. सर्रळ सरळ उतार दिसत होता, पण त्याच्या मते तो शॉर्टकट होता. ओके! मी आणि काका ‘आम्ही पुढे जाऊन रस्ता बघतो’ असं म्हणालो. जपत जपत पुढे गेलो तर खरंच निघाला की राव शॉर्टकट. थोडा बि‘कट’ असला तरी शॉर्टकट होता. ‘आहे आहे रस्ता आहे ! ’ असं ‘युरेका युरेका’ करून आम्ही मागे वळलो. आणि थक्क! लोहपुरुष एका दगडावर उभा होता. आमच्या दोघांच्याही सॅक एका हातात; त्याची सॅक पाठीवर. आम्हाला म्हणाला ‘घ्या’. आम्ही त्याच्या पायाकडेच बघत होतो. ‘अरे हे काय घातलंयस तू ***च्या?’ ‘काय?’, असं तो शांतपणे म्हणाला. ‘अरे स्लीपर काय घातल्यास??’ ‘हां! बूट खराब झालेले अरे. मी म्हटलं पण ना तुम्हाला की मी फार कॅज्युअल वाटतोय का ते...’  काही काळ सन्नाटा आणि मग संस्कृतमिश्रित हशा ! 



पुढे मग रमत गमत निघालेले आम्ही एका पठारावर आलो. इथून पेठच्या किल्ल्याचं, कोथळीगडाचं पहिलं दर्शन होतं. लांबवर हा किल्ला दिसतो आणि मधे दिसते ती अर्धवर्तुळाकार दरी. इथला परिसर अप्रतिम आहे. त्या दिवशी मात्र पावसाळा नुकताच सुरू झाल्याने परिसर म्हणावा तितका हिरवागार झालेला नव्हता. फोटो काढत आम्ही किल्ल्याच्या ‘अप्पर बेस’ ला पोहोचलो. ‘पेठ’ हे किल्ल्याच्या पायथ्याशी असलेलं सुमारे ६००-७०० लोकसंख्या असलेलं छोटंसं गाव. मुख्यत्वे भातशेती हा इथल्या लोकांचा उद्योग. इथे जेवायची खायची सोय छानपैकी होऊ शकते. भैरवनाथ हॉटेल मध्ये आम्ही आमच्या जेवणाची ऑर्डर दिली, कोकम सरबत ढोसलं, आणि किल्ल्यावर निघालो. इथे गावातल्या कुत्र्यांनी आमच्यावर यथेच्च भुंकून आपली रखवालदाराची भूमिका चोख पार पाडली. पण आम्ही बधत नाही म्हटल्यावर ते मागे सरले. 


 

वाटेत, पुढे येणा-या ट्रेकर बांधवांना मदत, म्हणून आम्ही दगडांवर दिशादर्शक बाण मारण्याचा उपक्रम करत चाललो होतो. ‘टू गिव्ह समथिंग बॅक’ हा त्यामागचा विचार. किल्ल्याची चढाई सोपी आहे. नवख्यांनाही फार त्रास न घेता जमेल अशी. पेठ पासून किल्ल्याच्या मुख्य दरवाज्यापर्यंत जायला पाउण एक तास पुरे होतो. दरवाजा भग्नावस्थेत आहे. त्या भग्न दरवाज्यातून आत गेल्यावर समोरच एक भैरोबाचं देऊळ, आणि एक पाण्याचं टाकं लागतं. डावीकडे वळल्यावर भैरोबाची प्रशस्त गुहा आहे. गुहेत कोरीवकाम केलेले खांब आहेत, व एक दोन मूर्ती आहेत. गुहेतील जमीन सपाट आहे त्यामुळे वास्तव्यास ही जागा सोयीची आहे. गुहा तशी स्वच्छ आहे. कुणीतरी सत्कार्य केलेलं दिसतं इथे येऊन. गुहेत थोडावेळ टेकतो, तोच लोहपुरुष एका कळशीत टाक्यातलं फ्रीज ला लाजवणारं पाणी घेऊन आला. त्याने रिफ्रेश मारलं, आणि बिस्किटं, मफिन खाऊन आम्ही गडफेरीला निघालो. एव्हाना एक वाजला होता.


 
या गडाची खासियत म्हणजे ही गुहा, आणि कातळात खोदलेला वर्तुळाकार जिना जो आपल्याला किल्ल्याच्या सर्वोच्च टोकावर घेऊन जातो. हा जिना एक बघण्यासारखी चीज आहे. किल्ल्याच्या टोकावरून सभोवतालचा परिसर अजून छान दिसत होता. इथून दिसणारे डोंगर म्हणजे भीमाशंकर, नागफणीचा डोंगर; असं काय काय वाचलं होतं पण मला काही ते ओळखता येत नव्हतं. वरती एक भगवा होत्या नव्हत्या वा-यावर फडकत होता. इथेच एक मोठा तलावही आहे. मग फोटोसेशन झालं, पंजे लावून झाले, ट्रॅश टॉक झालं, निसर्ग डोळ्यात, कॅमेरात भरून घेतला, आणि परत गुहेत आलो.


सभोवतालचा परिसर
   

  
उफळी तोफेचा एक भाग

जाम भुका लागलेल्या. फटाफट पेठ गावात उतरलो, भुंक-या कुत्र्यांना टुक टुक करून भैरवनाथ हॉटेल मालकांकडे पोचलो, आणि जेवणावर ताव मारला. श्रीराम सावंत यांचं हे हॉटेल आहे. (मो: ९२०९२ ६७४३३). आम्ही पोळीभाजी भात आमटी असं साधं जेवण मागवलं होतं. जेवण चविष्ट होतंच, पण दमून आल्यावर ते अजूनच भारी लागलं. इथेच बाहेर पंचधातूच्या उफळी तोफेचा एक भाग ठेवलेला आहे. त्या तोफेची स्टोरी सावंतांकडून ऐकली, आणखी थोड्या गप्पा मारल्या, आणि परतीच्या वाटेला लागलो. आता सगळे आपापल्या सोयीच्या वेगात निघाले. लोहपुरुष एक्सप्रेस अपेक्षित रित्या पहिले पोहोचली. मग काका आणि ‘२०१३ चा पहिला आणि लग्नाआधीचा शेवटचा ट्रेक असलेला’ निलेश, आणि सर्रवात मागून माझी पॅसेंजर.


गावात भेटलेले बोलके चेहरे

 परत येताना आकाशात निसर्गाने काढलेली अ‍ॅबस्ट्रॅक्ट रांगोळी

 २०१३ चा ओपनिंग ट्रेक संपन्न झाला होता. पाऊस मिळाला नसला तरी हा पावसाळी ट्रेक होता. व्हाईट स्टॅलियन गरगरवली आणि निलेश ला कर्जत ला सोडून काकांच्या घरी परतलो. वाटेत पेब ला धावतं ‘आत्ता दमलोय, पण नेक्स्ट टाईम नक्की’ म्हणून आलो. 

मोठ्या आकारातील फोटो बघण्यास या लिंक वर जावे. 
http://www.flickr.com/photos/23099850@N04/sets/72157634040518530/

Sunday, May 26, 2013

कधी एकदा...

मे महिना सरत चाललाय. उन्हाळा जाणवतोय परंतु मधूनच २-४ काळे ढग आकाशात दिसतात. पुढच्या ट्रेक ला लवकरच जायचंय असा दिलासा देऊन जातात. ऑफिसात काम करत असतानाही अचानक राजगडाचा चोर दरवाजा आठवतो, मनातले विचार कीबोर्डपर्यंत पोचतात आणि मग इमेल लिहिताना चुकून 'Dear Rajgad' असं लिहिल्यावर मी जीभ चावतो आणि बॅकस्पेस दाबतो. धीर धर ना राव! असं स्वत:लाच सांगतो.

मग फावल्या वेळात फेसबुक वर जाण्याऐवजी ट्रेकवर्णनं वाचतो. ब्लॉग वाचतो. रतनगड, तोरणा, साल्हेर, मुल्हेर, हरिश्चंद्रगड... अशा माझ्यासाठी डिझायर्ड डेस्टिनेशन्स चे फोटो गूगल वर बघून मी इथे असेन तेंव्हा काय करेन, मला काय वाटेल, मी कसा फोटो काढेन.. याचा विचार करत बसतो.

याचं कारण तो अनुभव. एखाद्या ट्रेक ला जाण्याच्या आधी रिसर्च करणं, ट्रेक ला जायच्या आदल्या दिवशी सॅक मधे सामान भरणं, मित्रांना फोन करणं, गाडी धुवून पुसून साफ करणं, तिथे जाणं, वाट शोधत शोधत निघणं, अधे मधे चुकणं, गमती जमती, विनोद, आठवणी काढणं, हे असं सग्गळं करून अखेर गडाचा माथा गाठणं....  तिथे जाऊन नि:शब्द पणे स्वत:भोवती गिरकी घेऊन तो आजूबाजूचा निसर्ग बघताना जे वाटतं ते केवळ अतुलनीय असतं. अंगावर शहारा येतो, अ‍ॅड्रेनलाईन रश होतो आणि तत्क्षणी जो मिळतो तो अनुभव. स्वर्गीय अनुभव. एखाद्या डोंगरकडेच्या कातळावर शांतपणे बसून रहाण्याचा अनुभव, ते अफाट चित्र डोळ्यात सामावून घेण्याचा प्रयत्न करण्याचा अनुभव, मुख्य दरवाज्याच्या कमानीतून पहिलं पाऊल गडावर टाकतानाचा अनुभव, या गोष्टी केवळ अवर्णनीय आहेत.

आणि त्यांचंच हे गुरुत्वाकर्षण आहे की मला पुन्हा पुन्हा तो अनुभव घ्यावासा वाटतो; ट्रेक ला जावंसं वाटतं. त्यामुळे आता कधी एकदा पुढचा ट्रेक ठरतोय असं झालंय !

Monday, May 13, 2013

My First Trek


I remember having looked at trekking as an alien thing; and trekkers as aliens. I was in my early college days back then, when we used to see those guys with backpacks double in size of out college sack, and a rolled up mattress like thing popping out of those backpacks. They'd typically be wearing trackpants with militari print, or capris, and some old, worn out t-shirt. Their hair would be undone, they would be wearing a watch bigger than their wrist, and their shoes would seem like they are cut out of rock.

They seemed strange. While our faces displayed irritation because of the crowded trains and stressful journeys, their faces meant all excitement. We never understood; I, never understood why someone would go and sweat the hell out of his body, tire himself wandering in some hills, instead of watching a movie, playing cricket, or just eating out with friends. I mean, there are so many easy and rewarding ways to spend a holiday. I never understood; only until I stepped in those rock-cut shoes.

It was a hot and sunny summer day when a friend of mine called me up asking if I was interested in going to Karnala Fort. Karnala is around 80 kms from Thane and he said we can go and come back in half a day. Since it is a bird sanctuary as well, we thought we could do some bird watching and climb the fort as well if we wish to. As I said, 'trekking' seemed alien then, and I was not SO willing initially. But then out of curiosity, if I may say, I said yes, we will go tomorrow. I love to travel and see new places, so I could build up the excitement pretty soon for myself.

At 5:30 am the next day, we were off to Karnala. Just the 2 of us in my darling M800 which sadly isn't with me anymore. We reached Karnala in just over an hour. We parked the car, paid the entry fee, and went inside. It is a fairly dense forest. Some caged birds are kept at the start of the trail. Then one way is marked as the way to the fort. But there is another way to the fort as well, which is the 'Mor Taka Trail'. Out of pure 'kida' we ventured to that trail, thinking that we will see some rare birds and discover something which not many must be aware of. 'Ideal time for bird-watching is actually 1 hour prior to and after sunrise', I was told by the friend who was with me. So, we were late. It was 7:30 then. It was quite bright already. We walked for more than 2 hours, stopping at every little chirp that we heard, only to find a sparrow or a cuckoo.

I realized at one point, that we had come to the same spot which we passed by, some time ago. Then my friend said that the same spot is where we took a turn from, even before that. We sensed a problem. In Marathi, this happening is termed as 'Chakwaa'; where a person loses his/her way somehow, like he/she was mesmorised, and keeps wandering around the same area and coming back to it. We were not mesmorised or hypnotized; we were just... lost. Lost while we went on taking photographs, trying to climb trees, or just doing balancing acts on the rocks. We decided to break the loop and so we turned in the direction of the pinnacle and started walking. We climbed a steep slope somehow which brought us to the main trail. Relieved; were we, finally. In next 30 minutes, we were on the top of the fort. At the base of the thumb shaped pinnacle. The view from the top was worthwhile. Absolutely amazing.


Coming back was relatively easier, and smooth. We came down drenched with sweat and tired as hell. I struggled to drive my car as my calfs and knees pained badly. We came home late in the afternoon and slept for hours. My first trek was a terrific one. Really a terrific one. A not-so-difficult trek seemed a so-difficult trek to me. 'If this is what those guys with huge backpacks do in the mountains; then this is not for me certainly', I thought to myself, 'I mean it was fun; it was tiring as well, but I don't feel like doing this every alternate weekend'. These thoughts were like the early vapors of barbeque, which disappeared very soon, leaving the heavenly taste behind; the heavenly taste of pleasure, heavenly taste of peace, and of purity. I couldn't wait for my next treks thereafter. Sharing pictures, telling stories went on. But somehow I had missed writing about my first trek experience.

My first trek had stunned me. But it had stunned me for good.

Saturday, May 11, 2013

व्यायामाचे प्रकार

व्यायाम हा एकंदरितच आजकालचा `हॉट टॉपिक' आहे. तरूण आहात, तर तारुण्य खुलवण्यासाठी व्यायाम; मध्यमवयीन आहात, तर तारुण्य टिकवण्यासाठी व्यायाम; वृद्ध आहात, तर फिट राहण्यासाठी किंवा, पाय, गुडघे, पाठ दुखू लागली आहे, म्हणून व्यायाम; श्रीमंत आहात, मग शो-ऑफ साठी व्यायाम; गरीब आहात, तर मग असाही काबाडकष्ट करून व्यायामच; अभिनेता/अभिनेत्री व्हायचंय, तर इंडस्ट्री ट्रेंड आणि डिमांड म्हणून व्यायाम; लग्नेच्छुक आहात, तर लग्न पटकन जमावं म्हणून छान दिसण्यासाठी व्यायाम; रोज व्यायाम, अधून मधून व्यायाम, कुणी सांगितलं म्हणून व्यायाम, आपल्याला वाटलं म्हणून व्यायाम...

पण याकडे बघण्याचे दृष्टिकोन वेगळे आहेत. गरजा वेगळ्या आहेत. तरी व्यायामाच्या आवर्ततेनुसार त्याचं तीन मुख्य प्रकारात वर्गीकरण होईल. ते प्रकार असे.

चहासारखा व्यायाम: यात जिम, किंवा योगासनं, चालणं, धावणं, नियमित खेळ खेळणं, असे प्रकार समाविष्ट होतात.
याची तल्लफ रोज येते. प्रमाण बेताचे आणि समान असते. यात सातत्य असते, परंतु दृश्य स्वरुपाचे बदल, फायदे, यात होत नाहीत. तरीही शरीराला त्याची सवय लागते. यात 'फिट' रहाण्याचे उद्दिष्ट मात्र निश्चित पूर्ण होते. आणि शरीराला, व्यायाम करणा-याला शिस्त पाळल्याचं एक आंतरिक समाधान मिळतं.

औषधासारखा व्यायामः म्हणजे, एखादा आजार, व्याधी जडल्यावर जो केला जातो तो व्यायाम. ह्रदयविकार - चालणे; पाठदुखी - चालणे, योगासने इत्यादी; किंवा फिजिओथेरपी आणि तत्सम प्रकार; यात मुख्यत्वे मानसिक समाधान मिळते, की आपण व्यायाम करत आहोत आणि आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. खरंच त्याचा शरीरावर किती प्रमाणात परिणाम होतो हा एक प्रश्नच आहे. पण असो. तो वेगळा विषय झाला.
वजन वाढलं की ते (तात्पुरतं) कमी करण्यासाठी एकदम जोशात येऊन केला जातो तो व्यायामही याच प्रकारात मोडतो. जस्ट लाईक अ‍ॅलोपॅथिक मेडिसिन. तुलनेने पटकन फरक होतो, तो दृश्य स्वरुपाचाही असतो. त्यामुळे `कॉम्प्लिमेंट्स' वगैरेही मिळतात. आणि मग एकदा आजार बरा झाला की कोण औषध घेतो?

दारूसारखा व्यायामः चौकटीतले प्रयत्न केले की चौकटीतलेच फळ मिळते; असं कुणीतरी म्हटलंय. चहा पिऊन कुणी झिंगत नाही. झिंग यायला दारूच लागते. चहा-कॉफी आणि दारू तसे सारखेच प्रकार आहेत; खरा फरक आहे तो इन्टेन्सिटी चा. व्यायामाचंही तेच आहे. चहा-औषधाच्या पुढे जाऊन फिटनेस मधलं उच्च ध्येय समोर ठेवून व्यायाम करणारी मंडळी जी आहेत, त्यांचा व्यायाम हा दारूसारखा असतो. `हार्ड'. रोज करता आला तर हवाच असतो. पण मूड आला की लागतोच लागतो. मग बाकी सगळ्या गोष्टी गौण असतात. त्या व्यायामात इन्टेन्सिटी असते. फोकस असतो. दारू पिऊन जशी झिंग येते, जसा हँगओव्हर येतो, तसं हा व्यायाम केल्यावर शरीरात काहीकाळ एक वेगळंच चैतन्य येतं, स्नायू प्रसरण पावल्याने आपल्याच नेहमीच्या साईझ च्या टीशर्टातून ते बाहेर डोकावू लागतात. आपण काहीही करू शकतो, आपण सशक्त आणि सक्षम आहोत असा आत्मविश्वास संचारतो. आणि एकूणच फील गुड, लुक गुड फॅक्टर येतात. झिंग उतरली की पुन्हा आहेच. असं असूनही या व्यायामाने होणारे बदल हे लाक्षणिक असतात. त्यांचं दूरगामी असणं हे मात्र तुमच्या सातत्यावर अवलंबून आहे. आणि हो; प्रमाणाबाहेर दारूचे जसे दुष्परिणाम आहेत तसेच या व्यायामाचे ही आहेत. प्रमाणाबाहेर केल्यास `करायला गेलो एक..' ची गत होऊ शकते. अतिउत्साहात येऊन एकदम रॉ घेतली की जशी अंगाशी येऊ शकते, त्याप्रमाणे अति जोशात नको ते करायला गेलं की व्यायाम महागात पडू शकतो. तेंव्हा; कंट्रोल महत्वाचा आहे.



पण मग आदर्श व्यायाम कुठला?

आदर्श असं काही नसतं यात. वर म्हटल्याप्रमाणे गरजा वेगवेगळ्या असतात. तेंव्हा आपली गरज ओळखावी आणि व्यायाम करावा. मात्र; दोन गोष्टी सांगाव्याशा वाटतात. एक म्हणजे; काहीही करावं; पण सातत्याने करावं. तरंच फरक होतो, आणि टिकतो. दुसरं म्हणजे; व्यायाम सुरू करण्या आधीच आपल्या मर्यादा ठरवून घेऊ नयेत. `चौकटीतले प्रयत्न = चौकटीतले फळ'. व्यायाम करायला लागलात; आपल्या कक्षा ओळखल्यात की मग वाटल्यास ठरवावं, त्या रूंदावायच्यात की नाही ते.अर्थात; त्या रुंदावण्यातच आत्मविश्वासाचं खरं रहस्य आहे. 

- अ. ज. ओक.

Friday, May 3, 2013

हातावर हात

सरबजीत.
सोडला म्हणायचं की सुटला म्हणायचं ते कळत नाही. गेली अनेक वर्ष काहीही चूक नसताना तो (ना)पाक हैवानांचे अत्याचार सहन करत होता. आपण कल्पनाही करू शकत नाही की त्याच्यावर काय प्रसंग ओढवले असतील. पाकांनी त्याला मृत्यू दिला म्हणजे एक प्रकारे 'सोडला'च. कारण आणखी असे किती महिने किती वर्ष त्यावर अत्याचार होत राहिले असते याचा नेम नाही. आणि मेला, म्हणून तो सुटलाच. एकीकडे अत्याचार सहन करायचे आणि दुसरीकडे आपला देश आपल्यासाठी, आपल्याबरोबर इथे अडकलेल्या ५४ पेक्षा जास्त युद्धकैद्यांसाठी काहीही.... करत नाही, या गोष्टीपायी मनस्ताप भोगायचा; यापेक्षा मरण बेहत्तर, असा त्यानेही विचार केला असेल.
युगं लोटली, पण अजूनही आपली अवस्था एखाद्या 'उंदराला घाबरणा-या मांजरीसारखी' आहे. (इथे ४ वेळेला वाघासारखी असं लिहून खोडलं मी; ही उपमा डिझर्वच करत नाही आपण.) आज जवान मारले, उद्या घुसखोरी, परवा काय आरोपच केले उलटे, मग आपले '#क्के' जरा काही बोलले की अमेरिकेच्या पदरामागे लपून आपल्याकडे बोट केलं;.... चीन चा उल्लेख नाही करत, कारण तो एक वेगळा विषय आहे. स्वतंत्र.
आपले मिलिटरी वाले मधे एक दोन वेळा म्हणाले न्यूज चॅनल वर, की आम्हला पाकिस्तान चं वाळवंट करायला १० मिनिटंही बास होतील. ते ऐकून काही काळ खूप चेव आला. रस्त्यावर चालतानाही चाल नकळत जलद व्हायची; जणू एखाद्या 'त्यांच्यातल्याला' मारायला चाललो आहे. पण तो चेव लवकरंच मावळला. अहो; वर्षानुवर्ष जे झालं नाही, ते आता का होईल? आताही तेच होणार.
तुम्ही मारा लाथेवर लाथ
आम्ही ठेवू हातावर हात..
आता बास ! असं म्हणून शब्दशः अखिल भारतीय 'उठाव' जर झाला, लोकंच्या लोकं रस्त्यावर बसली, स्वप्नवत काही झालं, तरंच आशा...
पण नाही. थिंक रियल. धिस इज इंडिया.

Saturday, April 20, 2013

एबीएस वाली रिक्षा

काल पुन्हा एकदा रिक्षाने लॉंग ड्राइव्ह अनुभवायचा योग आला. रिक्षात बसताना रिक्षा चालकाकडे एक आपली जस्ट नजर टाकली. चेहरा, स्टान्स वगैरे बघून अंदाज येतो साधारण की ही 'राइड' कशी असणार आहे ते. तेंव्हा संतुलित वाटला माणूस. अमूक ठिकाणी जाणार का? मी विचारलं. भविष्यवेत्त्याने भविष्य सांगण्याआधी जसा विचार करावा तसा एक ५-६ सेकंद विचार करून मानेला एक होकारार्थी आणि त्याचबरोबर आज्ञार्थी झटका देऊन तो रिक्षात बसला. त्या ५-६ सेकंदात काय गणित मांडलं त्याने कोण जाणे. मीही बसलो.
आपलं डावं बूड सीट च्या उजव्या भागावर स्थापून त्याने रिक्षाला किक मारलीन, खट्ट कन फर्स्ट गियर टाकला आणि झर्र्र्कन पिकप घेतला. व्हॉट अ स्टार्ट ! पहिल्याच डाव्या वळणावर मागून पुढे जाऊ पाहणा-या कार ला जे कोरणार केलंय त्याने ! तेंव्हाच कळलं, किक फक्त रिक्षाला बसली नव्हती !
सिग्नल आला. सिग्नल ला शेट थांबले. 'नशीब' असं म्हणतोय इतक्यात रिक्षा जवळ जवळ काटकोनात वळली, थेट राईट लेन ला आली, आणि बस आणि डिव्हायडर यांच्यातल्या खबदाडीतून डायरेक्ट पहिल्या पोझिशन ला येऊन उभी झाली. बसच्याही पुढे ! जस्ट वेटिंग फॉर द ग्रीन लाईट. मी सांगायला नको की ग्रीन लाईट लागल्यावर काय झालं. मग हायवे आला. आता खरी मजा!



बाकी सगळे गरीब रिक्षावाले डावीकडच्या दोन लेन मधून मूग गिळून चालले होते. त्या सगळ्यात आमची रिक्षा उजवी होती. आणि उजवीकडे होती. अख्खी रिक्षा एखाद्या मोबाईल प्रमाणे व्हायब्रेट होत होती, आणि उजव्या लेन मधून दणक्यात क्रूज करत होती. टर्बो-चार्ज्ड इंजिन असावं. समोर येणारे खड्डे त्या रिक्षावाल्याला बरोब्बर आणि स्पष्ट दिसत होते, प्रोजेक्टर हेडलाईट होते ना ! आणि ते दिसले कि तो सपकन एक छोटासा टर्न घेऊन ते चुकवत होता. अर्थात ! पॉवर स्टिअरिंग शिवाय हे शक्य आहे का? हे सगळं सुमारे सत्तर ऐंशी च्या स्पीडला. आमच्यापुढे असलेल्या गाडीला लाईट देणं चालूच होतं. साईड दिली असती तर ओव्हरटेकही केली असती म्हणा. न राहवून मी दोनदा म्हटलं त्याला की आरामात घे मित्रा घाई नाही आपल्याला. पण ते कसलं ऐकतंय ! सुसाटच चाललेलं पात्रं.

मग आमचं डेस्टिनेशन आलं. आलं म्हणजे, दृष्टीक्षेपात आलं. तोच ! तोच काय ! तोच पुढच्या बाईक वाल्याने ब्रेक मारला ! आणि की………क! असा आवाज करून आमची रिक्षा ५ एक फुटात थांबली. जागच्या जागी उभी. सरकली नाही की हलली नाही. इन द लाईन आणि ऑन द स्पॉट. माझ्या भीतीला समजावत मी म्हटलं, 'एबीएस आहे, त्यामुळे टेन्शन नाही.'

Tuesday, February 26, 2013

पुनःश्च किल्ले माहुली (Fort Mahuli Trek)

ठाणे जिल्ह्यातला सर्वात उंच किल्ला, माहुली. उंची सुमारे २८१५ फूट. माझ्या एका मित्राने २०१० साली हा किल्ला सुचवला, तिथे जायची योजना आखली, आणि आम्ही तीन मित्र तिथे ट्रेक ला गेलोही. पण काठिण्य पातळीचा चुकलेला अंदाज, पाण्याची कमतरता, शिवाय तापलेला सूर्य, अशा कारणांनी अर्ध्यातून परत आलो. पण तेंव्हापासून `माहुली' आमच्या अजेंड्यावर होता. २३ फेब्रुवारी २०१३ ची योजना फिक्स झाली. बघता बघता आठ जण जमलो आणि माहुली ला निघालो.

ठाण्यापासून ६१ किलोमीटर वर, शहापूर नजीक माहुली किल्ला आहे. नाशिक हायवे वर पडघा सोडताच डावीकडे ६-७ छोटे मोठे सुळके आपलं लक्ष वेधायला लागतात. एक आडवी पसरलेली ही डोंगररांग आहे. हा किल्ला बांधला कुणी याची खात्रीशीर नोंद इतिहासात नाही. शहाजी राजे, बाल शिवाजी आणि जिजामाता यांनी काही काळ इथे वास्तव्य केले आहे. पुरंदर च्या तहात मराठ्यांनी हा किल्ला गमावला. पुढे ३ वर्षात शिवाजी महाराजांनी एकंदरित २५० किल्ले पुन्हा काबीज केले, त्यात माहुलीचा समावेश होता. या आडव्या डोंगरावर खरंतर तीन गड आहेत, पळसगड, मध्यात माहुली, आणि भंडारगड. भंडारगडाच्याच बाजुला, नवरा-नवरी आणि भटजी, वजीर, नव-याची करवली, नवरीची करवली, अशी नामाभिधानं असलेले सुळके आहेत. हे ट्रेकर्स व रॉक क्लाईंबर्स ना आकर्षित करतात.


माहुली किल्ला तसा सोप्या श्रेणीत येतो. पण ट्रेक कठीण आहे. कठीण एवढ्यासाठी की सतत खडा चढ आहे आणि थांबायला मिळेल अशा किंवा जिथे पायांना आराम मिळेल अशा जागेचा अभाव. त्यामुळे कठीण नसला तरी दमवणारा ट्रेक आहे. अनुभवी ट्रेकर ला दोन ते सव्वा दोन तास पुरतात वर जायला. साधारण दीड्-पावणे दोन तास उतरायला. असा एक दिवसात होणारा हा ट्रेक आहे.


आम्ही सकाळी ९ ला पायथ्याशी पोहोचलो. चहा व मिसळ असं फ्युएल पोटात भरलेलं होतं. पायथ्याशी, विलास ठाकरे नामक व्यक्तीचं दुकान्/हॉटेल आहे. शिवाय गडवाटेची माहितीही ते आनंदाने पुरवतात. ९२०९५ २६२६८ हा त्यांचा भ्रमणध्वनी. गडाच्या पायथ्याशी असलेल्या देवळात गडाचा नकाशा आहे, त्याचा फोटो जरूर घेऊन ठेवावा. उपयोगी पडतो.



त्यांच्याकडून वाटेचा अंदाज घेतला आणि मार्गस्थ झालो. जे पटापट चढले त्यांना २ तास वरपर्यंत पोहोचण्यास पुरले. बाकीचे सुमारे ३ तासांनी पोहोचले. साधारण ४ टेकड्या पार करून गेलो की एक शिडी लागते. शिडी ब-यापैकी सुस्थितीत आहे. गड ८०% चढल्यावर पुढे २-३ कातळाचे पॅच लागतात. वरतून दिसणारा परिसर सुरेख आहे. हवेत फार ढग, धुकं, धूर नसल्यास तानसा जलाशयही दिसतो. पावसाळ्यात सगळा परिसर हिरवागार असतो. धबधबे वहात असतात. पण आत्ता उन्हाळ्यात मात्र निवडुंगांचं आणि रानफुलांचंच राज्य असतं.



वाटेत काही खत्राट स्पॉट लागतात. तिथून निसर्गाचं अप्रतिम दर्शन होतं.


गडावर विशेष काहीही उरलेलं नाही. गडावर प्रवेश केल्यावर समोरच एक पाण्याचं मोठं टाकं दिसतं. त्याच्या डावीकडून पुढे गेल्यावर आपण एका मोठ्या वृक्षापर्यंत पोहोचतो. जिथून लगेच खाली आपल्याला कल्याण दरवाजा, व काही गुहा आढळतात. गुहा स्वच्छ नाहीत. गावातल्या किंवा गावाबाहेरच्या बेजबाबदार लोकांनी येऊन या गुहांमधे चिकन/दारू चे सॉलिड बेत केलेत, करतात, हे समजतं. शिवाय `स्वप्नील बदाम स्वप्नाली', `अजय बदाम मोना' अशा महान व्यक्तींचा उल्लेख गुहांच्या भिंतींवर आढळतो.


कल्याण दरवाजा भंगलेल्या अवस्थेत आहे. तिथे असलेल्या माहिती देणा-या फलकावरही आधुनिक कोरीवकाम केलेले आढळते. आपल्या इतिहासाबद्द्ल असलेल्या आस्थादारिद्र्याचं हे एक उदाहरण.


तिथे थोडा वेळ विसावून विलास ठाकरेंना फोन केला. भंडारगडावर जाऊन यायला किती वेळ लागेल त्याचा अंदाज घ्यायला. पण उरलेलं पाणी, उरलेला वेळ, सर्वानुमते उरलेला स्टॅमिना, हे लक्षात घेऊन पुढच्या खेपेला भंडारगड करू असं ठरवलं आणि परतीच्या वाटेला लागलो. उतरतानाही दोन फळ्या झाल्या, एक एक्स्प्रेस, दुसरी पॅसेंजर. सुमारे ५ पर्यंत सगळे जण खाली आलो. पायथ्याशी देऊळ आहे, आणि त्या बाजूला विहीर. विहिरीचं थंड पाणी काढून हात, तोंड धुतल्यावर सगळा शीण गेला आणि आम्ही पुन्हा ताजेतवाने झालो.


या आणि मागच्या ट्रेक च्या आठवणी काढत गाड्या हायवेला लागल्या. आता सोनेरी शाल पांघरलेला माहुली `पुन्हा या' असं सांगत आम्हाला अच्छा करत होता.