Sunday, January 20, 2013

माज


मी एका ठिकाणी गाडी पार्क करायची जागा शोधत होतो. इतक्यात दोन बायका एका पार्क केलेल्या सँट्रोचं दार उघडून बसण्याच्या बेतात दिसल्या. मी विचारलं की तुम्ही गाडी काढताय का? मला खुन्नस देउन उलट प्रश्न करण्यात आला, ‘तुम्ही इथे रहाता का?’ मी म्हटलं, ‘त्याचा काय संबंध? मी तुम्हाला विचारलं की तुम्ही गाडी काढताय का, म्हणजे मी तिथे माझी गाडी पार्क करीन.’ ‘इथे बाहेरची लोकं येऊन गाड्या पार्क करतात...’ त्यांना मधेच तोडून मी म्हटलं, ‘ओ बाई, सभ्यपणे विचारतोय तर तुम्ही तिरक्यात कशाला जाताय? एक म्हणजे हा रस्ता आहे. कुणाच्या आवारातली जागा नाही. दुसरं म्हणजे मी इथेच रहातो. मुळात हे तुम्हाला सांगायला मी बांधील नाही.’ हे सगळं बोलणारी बाई तिच्यासोबत असलेल्या दुस-या बाईकडे बघून म्हणाली, ‘आपल्याला विचारतायत ! गाडी काढता का म्हणे!’

मग मी सिंघम मोड मधे गेलो. म्हटलं आता माझी सटकली. मी व्हॉल्यूम वाढवून म्हटल, ‘बाई मी सभ्यपणे; साधा प्रश्न केलेला, तुम्हाला तिरक्यात जायची काय हौस असेल मला माहीत नाही. पण याच्या पुढे तुम्ही एक जरी शब्द बोललात, तर मग अत्तापर्यंत मी जितक्या सभ्य भाषेत बोललोय त्याच्या दुप्पट असभ्य भाषेत बोलेन.’ डोळे बटाट्यासारखे मोठे करून आणि घुबडासारखे गोल गोल फिरवून ती बाई माझ्याकडे बघत बसली, मी चाकांचा कर्कश्य आवाज करून माझंही सांकेतिक वृत्तीप्रदर्शन केलं आणि फ्रेम च्या बाहेर गेलो.

माज होता त्या बाईला. जसा दर दुस-या व्यक्तीला असतो आज काल. आपल्याकडे गाडी आहे...माज. आपल्याकडे पैसे आहेत, माज. आपल्याकडे अजून काही असेल, माज. पुढे चालणारी गाडी एक सेकंद जरी स्लो झाली किंवा थांबली, की ठणाणा हॉर्न वाजवायला लागतात लोकं; मग मिळेल त्या बाजूने तडमडत ओव्हरटेक करायचा प्रयत्न, ती करता करता त्या गाडीवाल्याला एक रागीट लुक; जमल्यास एक शिवी... माज. आम्ही गाडी घेतली म्हणजे रस्ता, परिसर, सगळं विकत घेतलं असा समज होतो लोकांचा. आणि १०० पैकी ९० जण तसेच असतात त्यामुळे जागोजागी, पदोपदी खटके होतात. या ९० जणांत समाजाच्या काही ठराविक वर्गातील लोकं जास्त असतात.

रेल्वे प्रवासाचं बघा. लोकसंख्याही माजलेली असल्यामुळे गर्दी अपरिहार्य आहे. त्यातून तिकीट किंवा इतर गोष्टीसाठी शिस्तीत रांग लावायला आम्ही काय सुशिक्षित आहोत? ट्रेन मधे तुमच्या आधी कुणी चढलं, उतरलं, बसलं, आणि तुम्ही ‘का रे?’ असा प्रश्न नाही केलात तर तुम्ही भ्याड. कुणी तुम्हाला असा प्रश्न केला आणि तुम्ही उलट प्रश्न नाही केलात तरीही तुम्ही भ्याड. त्यामुळे तिथेही माज ओतप्रोत भरलेला असतो सगळ्यांच्या नजरेत, बोलण्यात, वागण्यात.



परवा एक सिनेमा बघायला गेलो होतो. तिथेही तेच. तिकीट खिडकीवर सगळ्यांनाच समान तिकिटं मिळतात. तर एक माणूस रांगेत घुसू पहात होता. त्याला त्याच्या मागच्याने विनवलंन, की बॉस, आम्ही सगळे रांगेत आहोत. तर त्याला दटावतो कसा; ‘मेरा प्लॅटिनम का है ! समझा क्या?... लाईन का बात करता है @#$@!’ मुंबईमधली घटना; हे अर्वाच्च्य बोलणारी व्यक्ती हिंदीत बोलली; ही नमूद करण्याची गोष्ट आहे.

रिक्षावाल्यांना जवळची भाडी विचारली तर माज. दुकानदारांना चार प्रकार काढून दाखवायला सांगितले तर माज. शासकीय कार्यालयातल्या कर्मचा-यांना शासकीय कार्यालयात असल्याचा माज. जिकडे तिकडे माजच; सौजन्य म्हणून काही असतं असं कुणाला सांगितलं तर खरं वाटणार नाही. हा ज्वर आहे ज्वर. हा अख्ख्या समाजाला जडलाय आणि बळावतोय. असं झालंय की, कुठल्याही बाबतीत, कुणीही कुणाला प्रश्न किंवा प्रतिप्रश्न केला की त्या व्यक्तीच्या भुवया उंचावतात, बाह्या वर होऊ लागतात, तोंडाचं गटार सुरू होतं. याचं मूळ अनेक गोष्टीत असू शकतं, पण याचं निष्पन्न मात्र एकच असेल... -हास.

No comments:

Post a Comment