Sunday, May 26, 2013

कधी एकदा...

मे महिना सरत चाललाय. उन्हाळा जाणवतोय परंतु मधूनच २-४ काळे ढग आकाशात दिसतात. पुढच्या ट्रेक ला लवकरच जायचंय असा दिलासा देऊन जातात. ऑफिसात काम करत असतानाही अचानक राजगडाचा चोर दरवाजा आठवतो, मनातले विचार कीबोर्डपर्यंत पोचतात आणि मग इमेल लिहिताना चुकून 'Dear Rajgad' असं लिहिल्यावर मी जीभ चावतो आणि बॅकस्पेस दाबतो. धीर धर ना राव! असं स्वत:लाच सांगतो.

मग फावल्या वेळात फेसबुक वर जाण्याऐवजी ट्रेकवर्णनं वाचतो. ब्लॉग वाचतो. रतनगड, तोरणा, साल्हेर, मुल्हेर, हरिश्चंद्रगड... अशा माझ्यासाठी डिझायर्ड डेस्टिनेशन्स चे फोटो गूगल वर बघून मी इथे असेन तेंव्हा काय करेन, मला काय वाटेल, मी कसा फोटो काढेन.. याचा विचार करत बसतो.

याचं कारण तो अनुभव. एखाद्या ट्रेक ला जाण्याच्या आधी रिसर्च करणं, ट्रेक ला जायच्या आदल्या दिवशी सॅक मधे सामान भरणं, मित्रांना फोन करणं, गाडी धुवून पुसून साफ करणं, तिथे जाणं, वाट शोधत शोधत निघणं, अधे मधे चुकणं, गमती जमती, विनोद, आठवणी काढणं, हे असं सग्गळं करून अखेर गडाचा माथा गाठणं....  तिथे जाऊन नि:शब्द पणे स्वत:भोवती गिरकी घेऊन तो आजूबाजूचा निसर्ग बघताना जे वाटतं ते केवळ अतुलनीय असतं. अंगावर शहारा येतो, अ‍ॅड्रेनलाईन रश होतो आणि तत्क्षणी जो मिळतो तो अनुभव. स्वर्गीय अनुभव. एखाद्या डोंगरकडेच्या कातळावर शांतपणे बसून रहाण्याचा अनुभव, ते अफाट चित्र डोळ्यात सामावून घेण्याचा प्रयत्न करण्याचा अनुभव, मुख्य दरवाज्याच्या कमानीतून पहिलं पाऊल गडावर टाकतानाचा अनुभव, या गोष्टी केवळ अवर्णनीय आहेत.

आणि त्यांचंच हे गुरुत्वाकर्षण आहे की मला पुन्हा पुन्हा तो अनुभव घ्यावासा वाटतो; ट्रेक ला जावंसं वाटतं. त्यामुळे आता कधी एकदा पुढचा ट्रेक ठरतोय असं झालंय !

4 comments:

  1. Mast re...
    trekking related tu kuthale blog vachatos ??

    ReplyDelete
  2. Rains and Trek are like Chai and Vadapav.... :)
    Nice engrossing rajgad..i mean read...hehe

    ReplyDelete