Wednesday, February 20, 2013

परका काळा घोडा

'मला ना, का कोणास ठाउक, इथे येऊन असं एखाद्या परक्या प्रांतात आल्यासारखं वाटलं.', माझी बायको म्हणाली. त्या वेळी, आणि त्या आधी तीन तास मला तेच वाटत होतं पण नेमक्या शब्दात मांडता येत नव्हतं.

दहावी झाल्यानंतरच्या मे महिन्याच्या सुट्टीत मित्रांबरोबर मुंबईला गेलो होतो तेंव्हाही हे असंच 'परक्या प्रांताचं' फीलिंग आलं होतं. पण तेंव्हा कुतुहल, उत्सुकता, या गोष्टी मोठ्या होत्या त्यामुळे ते तसं जाणवलं नाही. तिथली गर्दी परकी वाटली नाही, त्या गर्दीचा उबग आला नाही, गोंगाटाचा त्रास झाला नाही की काही नाही. या वेळी काळा घोडा कला उत्सवाला मात्र असं सगळं वाटलं. मन रमलं नाही.

आम्ही तिथे जायला उत्सवाचा शेवटचा दिवस निवडला होता. एक तर शेवटचा दिवस त्यात रविवार असं समीकरण होतं. मेगा ब्लॉक टाळावा म्हणून आम्ही गाडीने जायचं ठरवलं. मी, माझी बायको आणि माझी बहीण. अपेक्षेपेक्षा कमीच (आश्चर्यच!) वेळात आम्ही त्या इंग्रजांनी बांधलेल्या तरीही आपल्या 'सीएसटी' च्या इमारतीपर्यंत पोचलो. तिथून पुढे हुतात्मा चौकाजवळ एका गल्लीत गाडी पार्क करून आम्ही चालत काळा घोडा कडे निघालो.

एरवीपेक्षा त्या दिवशी तिथले पदपथ आणि त्यावर दुतर्फा असलेले विविध वस्तूंचे स्टॉल अधिक गजबजलेले होते. ‘शॉपर्स’ चा पूर आला होता. मग पुढे काळा घोडा उत्सवाचं मुख्य प्रवेशद्वार आलं. मित्राने फोन करून सांगितलं होतंच की 'तोबा गर्दी आहे'. पण प्रत्यक्ष बघून त्या 'तोबा' मागचा अर्थ कळलां. आणि तिथेच तेंव्हापर्यंत वाढत गेलेली उत्सुकता मावळायला सुरुवात झाली.


लाईनीत उगीचच मागून धक्के देणारी बेशिस्त मंडळी होतीच. लाईन म्हटली आपल्याइथे, की 'घुसे' आलेच. मग 'हम भी लाईन में खडे है बॉस...' असे काहींचे इशारे. एक परदेशी माणूस मेटल डिटेक्टर मधून जाताना त्याच्या खांद्याखालून एक व्यक्ती घुसू पहात होती. 'आर यू स्पेशल??? आर यू स्पेशल???' असं जरा रागाने विचारत त्याने त्याला मागे ढोसलं. आणि मग तो माणूस मागे बघून कुत्सित हसू लागला. एकंदरित आत कसं न्यूसन्स वालं पब्लिक असणार याची कल्पना आली. आत गेल्यावर एक सर्वसाधारण सर्वमान्य नियम म्हणून डावीकडून जायला व उजवीकडून यायला असे दर्शक फलक होते. पण नियम मानू, त्यांचा मान राखू तर आम्ही कसले ! त्यामुळे कुणीही कसंही कुठूनही येत होतं जात होतं. वर बरोबर जाणा-यांकडेच रागाने बघत होतं. आणि आम्हाला कळेना की आम्ही कुठे जावं.

माझ्या बाजूला एक आजोबा उभे होते. कलेचे जाणकार होते हे नक्की; कारण तिथल्या एका शिल्पाकडे ते फार निरखून बघत होते, त्याला अभ्यासत होते. आणि मागून एक मुलगा आला, त्यांना बाजूला लोटत सोबतच्या दोन फॅशनेबल मुलींना जागा करून देत म्हणाला, 'हिलते नही है जगह से; बंदर साले'. प्रचंड तिडीक गेली डोक्यात. ही कोण माणसं, कोणाला शिव्या देतायत? आणि कसल्या ताकदीच्या जोरावर? आणि हीच माणसं आहेत जिकडे तिकडे, मग आपली माणसं कुठं आहेत? मुंबईची माणसं कुठं आहेत? की हीच; मुंबईची माणसं आहेत? असा विचार माझ्या मनात थैमान घालतो तोच लोंढ्याच्या सोबत मी स्टॉल्स कडे पावलं टाकायलां लागलो. सेलिब्रिटी देवस्थानांमधल्या रांगेप्रमाणे 'बेबी स्टेप्स' टाकत पुढे सरकत होतो. एखाद्या स्टॉल वर वाटलं की थांबून जरा बघाव्या तिथे असलेल्या कलाकृती, तर तसं करणं महाकठीण होतं. स्टॉल्स तुडुंब भरलेले होते, आणि लोकांच्या प्रवाहाला थांबायचं नव्हतं. द सिटी दॅट नेव्हर स्टॉप्स ना बाबा.

तिथे एका स्टॉल वर वाया गेलेल्या होर्डिंग्स पासून बनवलेल्या पर्स आणि बॅग विक्रीस ठेवल्या होत्या. 'ए वाव ! ये तेरे पर्पल ड्रेस पे क्या जाएगा !' 'नही रे ये बहोत रॉ लगता है. उसपे लेदर ही चाहिये' तिथे उभ्या दोन मुलीं बोलत होत्या. ते ज्याने बनवलं होतं त्याच्या चेह-यावर हे स्पष्ट लिहिलेलं दिसलं की 'माझी कल्पना, कला, मेहनत याचं काहीच नाही !' प्रत्येक स्टॉलवर काहीसं हेच चित्र होतं. की कला किंवा त्या कलाकृतीमागे लागलेली मेहनत याला किंमत नगण्य होती.

'हां हॅलो कहां है? अरे क्या यार. आय अ‍ॅम अ‍ॅट काला घोडा इट्स ऑसम मॅन' असं मित्राला फोनवर सांगणा-याला काळा घोडा फेस्टिवल म्हणजे काय हे कळलंच नव्हतं. त्याला फक्त उद्या मित्राला, कलीग्स ना, जाउन सांगायचं होतं की मी काळा घोडा ला जाउन आलो. काही मुलं आपल्या ग्रूप बरोबर ‘सहलीला’ आली होती, काही स्त्रीया तिथे लग्नसमारंभासारखे भरजरी कपडे दागिने घालून मिरवायला आल्या होत्या, काहीजण असंच मॉल मधे जाऊन कंटाळा आला म्हणून आले होते. मग तिथे मधेच उभं राहून हातातल्या टिचभर मोबाईलने फोटो काढणं; शूटिंग करणं असे प्रकार चालू होते. एकूणच तिथे आलेल्या गर्दीत बहुतांश मंडळी आपल्या कलासक्ततेचा शो ऑफ करायला आलेली होती. बाकी जण त्या मंडळींच्या गर्दीच्या धक्क्यांना नम्रपणे दुर्लक्षित करून काळा घोडा कला उत्सव अनुभवत होते.

तिथली घुसमट काही वेळातच असह्य झाली. तसंही नीट पणे काही बघता, न्याहाळता येतच नव्हतं. गाडी गाठली आणि आपलं शहर गाठलं. गोष्टी हाईप केल्या ना, की असं होतं. असे उत्सव कमर्शियलाइज झाले, की संपलं समजायचं. त्या उत्सवाचा गाभा, आत्मा हा विरून जातो. मला तरी तसंच वाटलं या वेळी. घरी आल्यावर प्रश्न झाला, ‘कसा होता काळा घोडा?’ मी म्हटलं, ‘खूपच काळा होता.’

4 comments:

  1. Agdi barobar mandalyes wichar. ya weli changlach 'farak' janavla. sad but true picture..

    ReplyDelete
  2. भावना छान व्यक्त केल्या आहेत. पण आमच्यासारख्यांना काळा घोडा उत्सव म्हणजे काय हे माहीत नाही त्याची थोडी ओळख करुन द्यायला हवी होतीत.

    ReplyDelete
  3. सुंदर! सद्य स्थिती समर्पक शब्दात मांडणारा लेख. सर्वत्र बाजारीकरण झाल्याने खरे कलेचे चाहते गर्दीची ठिकाणे टाळतात. परंतु असे व्हायला नको. खऱ्या रसिक लोकांनी आपला आत्मविश्वास कायम ठेवला पाहिजे आणि सामाजिक जीवनातील आपले अस्तित्व शाबूत ठेवायला हवे.

    ReplyDelete
  4. अगदी!
    मी टाळलंच जायचं. मागच्या दोन काळा घोडापासून घोडा काळा होत आहे.

    ReplyDelete