Wednesday, May 30, 2012

स्विस मेड


स्वित्झर्लॅंड ला जायचं म्हणून प्रचंड उत्सुकता होती, उत्साह होता. विमान प्रवास नवीन नव्हता. पण एमिरेट्स ने जायचं म्हणून कुतुहल होतं, कारण त्या विमानकंपनीबद्दल खूप चांगली मतं ऐकून होतो.

मुंबई विमानतळावर चेक इन करताना ’अजून भारतातच आहोत याची पदोपदी जाणीव झाली’... रांग दिसत असूनही ढुशी मारून पुढे जाणारी, कलकलाट करणारी, बिंडोक पणाची परिसीमा गाठूनही ’आम्हीच ते शहाणे’ असा भाव तोंडावर लेवून फिरणारी, क्रमाने येण्याचे आवाहन असूनही बोर्डिंगच्या चिंचोळ्या काउंटरशी ७५% ऑफ वाला सेल लागल्यागत गर्दी करणारी, आणि तरीही एअरलाईन कर्मचा-यांशीच उलट हुज्जत घालणारी गुरं काही पाठ सोडेनात. दुबई एअरपोर्ट ला अर्धी गुरं पांगली. पण अर्धी पोचलीच आमच्याबरोबर स्वित्झर्लॅंड मधे. असो.


आपण खूप सुंदर निसर्ग लाभलेल्या आणि तो जपलेल्या देशात आहोत हे पहिल्या काही मिनिटातच कळलं. लुगानो लेक कडे सॅन सॅल्वातोर नावाच्या डोंगरावरून बघताना जी मजा आली ती अवर्णनीय होती. आणि तिथे जाण्या येण्यासाठी केलेली कॉगव्हील रेल्वे, जी जमिनीशी जवळपास ६० अंशाचा कोन करून चालते, ती सॉलिड’च’ होती.



लुगानो मधे एका बस स्टॉप वर एका साधारण वयस्कर अशा तेथील कर्मचा-याला अमूक ठिकाणी कसं जायचं असं विचारलं मात्र; आणि त्या माणसाने स्वत: धावपळ सुरू केलीन. मग आम्हाला तिथे जाणारी बस येईपर्यंत थांबून, त्या बस च्या चालकाला आमच्या वतीने ’आमचा स्टॉप आला की जरा सांगा हं’ ही विनंती करेपर्यंत त्याने आम्हाला मदत केली. मदत म्हणा, किंवा ड्युटी म्हणा; त्याच्यासाठी दोन्ही एकच होतं. 

 
 
लेक लुगानो च्या काठावरून संध्याकाळची गार हवा खात फिरताना खूप छान वाटतं; शांत वाटतं.





संध्याकाळचे ६ वाजून गेले की इथे शहरं पेंगू लागतात; रस्ते रिकामे होऊ लागतात. चालू रहातात ते केवळ हॉटेल्स आणि बार.


लुगानो मधे दिवसभर फिरून रात्री कधी झोप लागली कळलंच नाही. पण हा फोटो काढण्यावाचून मात्र राहवलं नाही.


No comments:

Post a Comment