Saturday, February 4, 2012

निरामय शांतता

डोळा उघडला तेंव्हा त्या दगडी भिंतींच्या खोलीत मिट्ट काळोख होता. बरोबरचे तीन मित्र, आणि ट्रेकिंगला आलेले इतर ग्रूप्स ढाराढूर होते. उंच बॅगवर डोकं ठेवून माझी मान आखडलेली वाटत होती. मोबाईलमधे वेळ बघितली; पहाटेचे ४ वाजले होते. जास्त आवाज न करता मी उठलो, आणि बॅटरीचा सावध प्रकाश टाकत व्हरांड्यात आलो. व्हरांड्याच्या एका टोकाला गडावर स्थायिक असलेला कुत्रा दोन भिंतींच्या कोनाचा आडोसा करून झोपलेला. दुस-या टोकाला काही दगड, काही भांडी, काही लाकडं होती. समोरच आदल्या रात्रीच्या शेकोट्यांची राख धग धरून होती.

इतक्यात वर लक्ष गेलं. काळं कुट्ट आकाश, आणि त्यात अब्जावधी ता-यांचं मंडळ. एखादं आठवणारं नक्षत्र शोधायला जायचो आणि त्या ता-यांच्या गर्दीत हरवायचो. नजर पोचेल तिथपर्यंत पसरलेल्या त्या लखलखाटाला काय म्हणावं कळेना. तो नज़ारा अंगावर यायला लागला. मग माझं लक्ष लांब डोंगराखालच्या गावातून येणा-या आवाजाकडे वळलं. ४००० फूट खाली गावातल्या देवळात कसलासा उत्सव किंवा सप्ताह चालू असावा त्यामुळे लाउडस्पीकरवर भजनं गात होती मंडळी. ते देऊळ, तिथली रोषणाई, तो मांडव, सगळं नीट ओळखू येत होतं. दिवसाच्या त्या विशाल खो-यावर अंधाराचा पडदा पडल्यामुळे ते छोटंसं देऊळ खूप उठून दिसत होतं. मी व्हरांड्याच्या भिंतीला टेकून खाली बसलो. एकटाच; डोळे मिटून.


’रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी, तोहा विठ्ठल बरवा, तोहा माधव बरवा’ भजनाच्या या ओळी कानावर यायला लागल्या. मला माझ्या १५ दिवसांच्या त्या लोकल ट्रेन मधल्या प्रवासाची आठवण झाली जेंव्हा आम्ही भजनी मंडळाच्या डब्यातून प्रवास केला, त्यांच्या सुरात सूर मिळवला, ताल धरला, आणि आनंद मिळवला. त्या एकंदरीत प्रकाराने मला शहारल्यासारखं झालं. मनात चलबिचल होती. एकदा वाटायचं आत्ताच्या आत्ता खाली त्या देवळात जावं, आणि तल्लीन व्हाव भजन ऐकण्यात, गाण्यात. तेंव्हाच वाटायचं की त्यापेक्षा हा इथे असलेला भाव, ही शांतता, ही वेळ जमेल तितकी मनात साठवून घ्यावी. नवीन नवीन कल्पना विजेच्या ठिणग्यांसारख्या मनात येत होत्या, नव्या वाटा दिसत होत्या, आलेल्या वाटांवरच्या अडथळ्यांची उकल होत होती, सगळं एकाच वेळी. काही काळ असाच गेला. हळू हळू मन शांत व्हायला लागलं.

लोकलमधल्या भजनांच्या सुरात जसा आम्हाला माणसांच्या गर्दीचा विसर पडायचा, तसाच मला आता विचारांच्या गर्दीचा विसर पडत होता. बाकी तो आवाज वगळता निरव शांतता पसरली होती. पण भजनाचा तो सूर या शांततेला भंग न करता तिचं सौंदर्य वाढवत होता. ’PEACE... this is peace as I like it' मी माझ्याशीच म्हटलं; पण जणू कुणाला सांगतोय असं.

हा माझ्या राजगड ट्रेक मधला परमोच्च आनंदाचा आणि उपलब्धीचा बिंदू होता. पहिल्या दिवशी तीन तास दमछाक करून वर आल्यावर जी विजयाची भावना अनुभवली ती काही वेगळीच होती. विहंगम दृश्य आणि त्यांना कॅमेरात साठवण्याची लगबग याशिवाय ट्रेकला काय मजा. सूर्यास्त गाठायचा म्हणून एका गावक-याने आम्हाला सांगितलेली सुवेळा ते संजीवनी माची जाणारी वेगळी वाट आम्हाला एका वेगळ्याच बुरूजावर घेऊन गेली. पण तिथून सूर्यास्त इतका सुरेख दिसला की त्याशिवाय ट्रेक अपूर्ण राहिला असता. रात्री शेकोटीजवळ बसून मारलेल्या गप्पा, सर्चलाईट ने केलेला टाईमपास, खाल्लेली बिस्किटं, ब्रेडबटर आणि प्यायलेला चहा ही तर ओव्हरनाईट ट्रेकची खरी मजा होती. ज्या वाटेवरून चढतानाच इतकं साहस झालं त्याच वाटेवरून उतरतानाचा रोमांच आणि मग पुन्हा पायथ्याशी आल्यावरची यशाच्या संपूर्णतेची भावना; सगळंच अविस्मरणीय. पण या सगळ्याचं सार ’माझ्यासाठी’ त्या पहाटेच्या शांततेत होतं.

4 comments:

  1. It is Human to want to share our happiness and sorrows. It's an art to be able to do so... But wanting to share your peace and doing so in such a tranquil manner is what has set this post apart from the rest!

    ReplyDelete
  2. hello AJ
    Good thoughts.. really liked your blog


    regards
    Shantaram Phulare
    9820733118

    ReplyDelete
  3. Thank you very much Sir. Your comment is special for me.

    ReplyDelete