Tuesday, November 8, 2011

मराठी दैनिक साबण (डेली सोप)

DISCLAIMER: खालील पोस्ट मधील शेरे, फोटो हे केवळ उदाहरणादाखल असून लेखकाचा कुठल्याही वाहिनीवर नटावर/नटीवर किंवा मालिकेवर टिप्पणी करण्याचा हेतू नाही. तेंव्हा कृपया खालील मजकूर विनोदार्थाने वाचावा आणि (दैनिक साबणात होतात तसे) गैरसमज टाळावेत अशी विनंती.

मराठी दैनिक साबण आजकाल फारच बुळबुळीत आणि घसरडे होत चाललेत. त्यांच्यासंदर्भातील ही काही निरीक्षणं.

१) या मालिकांची नावं हा एक अभ्यासाचा विषय म्हणावा लागेल. हिंदीत लांबलचक नावांची चलती आहे. ’देस मे निकला होगा चांद’ ‘यहां मैं घर घर खेली’ अशी नावं. मराठीत छोटी नावं आणि लांबलचक नावं दोन्ही समान लोकप्रिय आहेत.

२) इथे ‘पात्रं’ अचानक पटकथेत येतात काय, तितक्याच सहजतेने बाहेर जातात काय; पुन्हा येतात काय... सगळंच बेताल. यात माणसाची सरासरी वयोमर्यादा १०० - १५० वर्ष असते. मेलेली माणसं जिवंत होतात हे तर या लोकांनी ठाम गृहितच धरलंय.

३) एका घरातील दोन माणसं एकमेकांवर कुरघोडी न करतील तर नवल. कुरघोडी म्हणजे अगदी कुणी केलेल्या पदार्थात त्या व्यक्तीच्या नकळत मीठ/तिखट/पाल वगैरे जिन्नस मिसळण्यापासून ते कोयतीने एखाद्याचा जीव घेण्यापर्यंत. तरीही ’आमच्या घराण्यात...’ वगैरे असे आत्मश्रेष्ठत्व आणि आत्मपावित्र्य दर्शविणारे संवाद त्यांच्या तोंडी सर्रास असतात.

४) विरोधाभास इथेच थांबत नाहीत. गुळगुळीत फरशा, उंची सोफासेट, भरजरी पडदे, आणि एकूणच बघणा-याचे डोळे दिपविणा-या घरात रहाणारी माणसं गरीबीच्या वगैरे गोष्टी करतात; त्यांच्यावर उधार मागण्याच्या, दागिने विकण्याच्या वेळा येतात. कमालच आहे.




५) लफडी. लफडी हा जणु प्रत्येक व्यक्तीच्या चारित्र्याचा अविभाज्य भाग आहे, असं हे दैनिक साबण बघून वाटेल. कारण, कथेतील व्यक्तिरेखा सभ्य असो किंवा असभ्य (यांच्या व्याख्या पुन्हा पडताळून बघण्याची गरज आहे), गरीब असो किंवा श्रीमंत; तिचं कुठे नं कुठे, कधी न कधी लफडं/प्रकरण/अफेअर हे असलंच पाहिजे. नाहीतर मग कथेत मजा नाही असं समजलं जातं.

६) साधारण सगळ्याच दैनिक साबणांतील कुटुंबांनी; काही वेळा काही ठराविक पात्रांनी दु:ख, संकट, आपत्ती यांच्याशी AMC केलेलं असतं. ठराविक काळाने या मंडळींची दारं संकटं, दु:ख ठोठावतंच असतात. आणि मग १०-१२ भाग ती त्यांच्या आयुष्यात ठाण मांडून असतात.

७) ब-याच मालिकांमधे इंग्रजी शब्दांचा पुरेपूर वापर आढळतो. मराठी व्याकरणाचे दिवे ही मंडळी लावतातच; त्यात इंग्रजी म्हणजे धमालच. बरं त्या व्यक्तिरेखेचं शिक्षण कितीही असो (वा नसो), इंग्रजी शब्द भारी वापरले जातात.



८) यातील भांडणाचे प्रसंग बघताना एको पॉईंट ची आठवण होते. एकच वाक्य... ४-५ वेळा घुमतं. तितक्यांदाच कॅमेरा घुमतो. साधारणपणे एक व्यक्ती बोलत असते आणि किमान ५ व्यक्ती ऐकत असतात. उपस्थित असलेल्या सगळ्या व्यक्तींच्या चेह-यावर हा कॅमेरा आलटून पालटून गचक्यासरशी येतो. इंटेन्सिटी वाढते म्हणे याने चित्रिकरणाची. मागे एखादी आक्रमक सुरावटीची सरगम/तराणा, किंवा एखादा श्र्लोक, किंवा नुसती मृदुंग तबल्याची जुगलबंदी वाजत असते.

९) योगायोग म्हणजे काय घडावेत ना.. हे या दैनिक साबणवाल्यांनीच जाणावं बाबा. टायमिंग ची दाद द्याविशी वाटते. म्हणजे कुणी माणूस काही चोरत असतो... तो ते चोरतो... आणि घराबाहेर पडल्यावर.. मग घरमालकाला जाग येते. कुठला एक पुराव्याचा कागद एका ठिकाणी पडून असतो... तो शोधणारी व्यक्ती तिथे येते... तेंव्हाच एक गाडी तिथून जाते आणि वा-याने तो कागद... उडत नाही हं... फक्त उलटा होतो...पण त्या व्यक्तीला तो उचलून बघावासा वाटत नाही. अशी अनेक उदाहरणं.

१०) इथे बाकी छपरीगिरी करणारे नायक नायिकेसमोर मात्र अलंकारिक वगैरे बोलतात. लहान मुलं चाळीशीचा अनुभव गाठीशी असल्यासारखे डायलॉग फेकतात. वर म्हटल्याप्रमाणे लफडेवाली माणसं ‘कर्तव्य, जाणीव, आपुलकी’ अशा संकल्पना जोपासतात. सांगू तितकं कमी आहे.

 पण लोकं बघतात बाकी आवर्जून हे सगळं. यामुळे घरातल्या मुलांवर वगैरे काय परिणाम होतायत हा भाग वेगळा; ते दिसायला लागेलच काही वर्षांनी; पण नकळत मोठ्या माणसांना सुद्धा मानसिक आजार झाले तर नवल वाटायला नको.

टी आर पी चा फुल फ़ॉर्म माझ्या मते ‘तरीही रोज पहाणे’ असा असायला हवा. या तरीही च्या मागे असलेली कारणं वेगवेगळी असतील अर्थातच.

असो. निरीक्षणात आलेल्या काही गोष्टी लिहू म्हटलं. पुन्हा अशी यादी जमली की याच पोस्ट चा ‘सिक्वेल’ लिहीन.

5 comments:

  1. अगदी खरं! आणि विरोधाभासाची गोष्ट बघ की TRP चा Full-form तुला ‘उमगण्यासाठी’ त्या TRP मधून तुलाही जावं लागलं! म्हणूनच हे निरीक्षण!

    ReplyDelete
  2. Lai bhaari... :P
    Mast lihilay...aani khar pn... :)

    ReplyDelete
  3. शेवट माहित असून सुद्धा आम्ही " तरी रोज पहिले " , " तरीही रोज पाहतो " आणि " तरी रोज पाहणार " :)

    ReplyDelete