Monday, October 14, 2013

सारु अहमदावाद; सारु गुजरात

नमस्कार,

सद्ध्या मोदी चा काळ आहे. पंतप्रधानपदाच्या दिशेने त्याची चालू असलेली वाटचाल जबरदस्त आहे. शिवाय त्या माणसाने गुजरात मधे केलेल्या कार्याच्या जोरावर त्याला लोकांचं पाठबळही भक्कम मिळतंय. त्याच्याच या कार्यक्षेत्री जाण्याचा योग गेल्या वर्षी आला होता. तेंव्हा तिथे काढलेली काही छायाचित्रे आपल्यासमोर मांडतोय. खरं तर वर्णनही लिहायचं होतं, परंतु 'वेळ' मिळत नाही ... नेहमीचं रडगाणं. असो. अमदावाद नी फोटोज जुओ !

a
अडालज विशालविहिरीचं वास्तुवैभव

a
अडालज चं आणखी एक रूप

b
जागोजागी, रस्तोरस्ती मोर बघायला मिळतात

b
अंबाजीच्या वाटेवर दिसलेला हा एक चुनखडकाचा डोंगर.

aaa
गब्बर वरून दिसणारा लँड्स्केप

aaa
कच्छी बियर भाया. छास पिवाना?

q
सूर्यमंदिर

a
सूर्यमंदिर

aaa
आ छे कांकरिया लेक

aaa
तिथे असलेल्या अनेक ऐतिहासिक वास्तूंपैकी ही एक लक्षवेधी वास्तू

aaa
हॉटेल विशाला च्या मालकाने जमवलेली ही भांडीसंपदा... अप्रतिमच

तर असं हे सुंदर राष्ट्र गुजरात. नाही नाही; या म्हणण्यास कुठलाही राजकीय संदर्भ नाही :)


Monday, October 7, 2013

रत्नवत रतनगड । Ratangad Trek

मी कॉलेजमधे असताना इमेल फॉरवर्डिंग फार चालायचं. त्यावेळी मला एक इमेल आली होती. त्याची सब्जेक्ट लाईन होती 'रतनगड - अ प्लेस अबोव्ह क्लाउड्स'. एकापेक्षा एक खलास फोटो बघून माझ्या मनात त्या जागेबद्दल भयंकर कुतुहल निर्माण झालं होतं. तेंव्हा मला ट्रेकिंग मधला 'ट' ही ठाउक नव्हता आणि ती आवडही निर्माण झालेली नव्हती.

त्या 'प्लेस अबोव्ह क्लाउड्स' ला जायचा योग आत्ता आला. दोन महिन्यांच्या ऑफिशियल (म्हणजे ऑफिसासाठी किंवा ऑफिसामुळे) ब्रेक नंतर ऑक्टोबर ला ट्रेक करण्यासाठी तीन किल्ल्यांनी उमेदवारी अर्ज भरले होते. पण शेवटी भंडारद-याचं सौंदर्य, आणि पूर्वीपासूनची असलेली दावेदारी या निकषांवर रतनगडची निवड झाली. बेत ठरला. ५-६ ऑक्टोबर. गडावर जाणे, रहाणे, खाणे, आणि गड बघून, निसर्गाच्या कुशीत मनसोक्त राहून दुस-या दिवशी परत येणे. अनेकांचे ऑफिशियल ब्रेक लांबले आणि शेवटी तिघांची फळी जमली. लोहपुरुष- बाबा परेश, शिवभक्त अनिकेत (विदाउट दाढी) आणि मी. 
कसं जायचं या आधी, काय खायचं हे ठरवणं महत्वाचं असतं. आम्हीही ते केलं. वरती जाऊन मॅगी करण्याचं ठरवलं. मग आदल्या दिवशी एकमेकांना फोन करून आपापले 'KRA' फिक्स केले आणि ठरल्या वेळेच्या १५ मिनिटं उशीराने मी आणि अनिकेत भेटलो. ही १५ मिनिटं मी गाडीत ऐकण्यासाठी पेनड्राइव्ह मधे गाणी भरण्याचं एक क्रिटिकल काम करत होतो. 

परेश आसनगाव स्टेशन ला भेटणार होता. 'कुठे आहेस? स्टेशन ला पोचतोय. ओके आम्ही आहोत बाहेर. अरे आसनगाव नाही, डोंबिवली स्टेशन ला पोचतोय.' ....... 'आता कुठे आहेस? येतोय. अरे मला सांग, अंबरनाथ वगैरे लागतं तिथेच जायचं ना? "????" अरे बाबा ते कर्जत साईड ला राहिलं, तुला कसारा ला यायचंय. परेश तू कर्जत ट्रेन नाही ना पकडलीयस??? नाही नाही. आलोच.' असे काही काळजाचा ठोका चुकवणारे संवाद माझ्या आणि परेश मधे झाले. आणि ब-याच उशिराने तो आसनगाव स्टेशनच्या बाहेर आला. आम्ही पहिला प्रश्न त्याला केला तो असा की भांडी आणली आहेस ना?.. त्याने भांडी आणलीयत, हे ऐकून जीव भांड्यात पडला. मग त्याने घोषणा केली की त्याने आम्हाला खायला पेस्ट्र्या आणल्यात. माफ! ताबडतोब त्याला हा सगळा उशीर माफ करण्यात आला.

८:४० ला गाडी गरगरवली ती डायरेक्ट भंडारद-यात थांबवली. रतनगडच नव्हे तर तिथवर पोहोचेपर्यंत दिसणारा एक अन एक डोंगर सुंदर आहे. भंडारदरा किंवा सह्याद्रीची कळसुबाई रांग ही निसर्गसौंदर्याने नखशिखांत नटलेली आहे. त्रास इतकाच झाला, की रस्ता कमालीचा खराब झालेला असल्याने आमच्या आधी गाडीचा ट्रेक झाला, आणि आमची हाडं भूकंप झाल्यागत शरीरात हलली.
उशीर आणि ऊन झाल्यामुळे अमृतेश्वराला उद्या नमस्कार करू, आधी गडाच्या वाटेला लागू, कारण नेढ्यातला सूर्यास्त बघायचाय, असं म्हणून बॅगा पाठीवर चढवल्या. गाईड म्हणून एका बारक्या मुलाला विचारलं, तर ६०० रुपये सांगितले. मुरलेल्या बिजनेसमन प्रमाणे घासाघीस करत होता लेकाचा. पण ३०० च्या खाली तयार नाही. अर्थात, त्याला फूस लावणारे त्याच्या मागेच बसलेले चार जण आहेत हे कळायला आम्हाला वेळ लागला नाही. शेवटी सागर नावाचा एक जण १५० रुयपात आम्हाला 'जिथून आम्ही चुकू शकणार नाही' अशा ठिकाणी सोडायला तयार झाला. 
इथली लोकं जरा जास्त सोकावलेली वाटली. त्यांच्या उत्तरातून, चेह-यावरून, एकंदरीतच आमच्याशी वागण्यातून असं सतत जाणवत होतं. सागर ने आम्हाला चढ सुरू होईस्तोवर साथ केली. इथवर पोहोचायला साधारण एक तास लागतो आणि दर १० मिनिटांनी प्रवरा नदीचं पात्र गुडघ्याएवढ्या पाण्यातून पार करत जावं लागतं. शेवाळं असल्याने त्यातही धमाल आली. कधी वाकून, कधी साखळी करून आम्ही ते पार केलं. पुढचा चढ दाट जंगलातून आहे, आणि मध्यम आहे. आम्ही रमत गमत चाललो होतो. 
प्रत्येक ट्रेक मधे माझ्यासाठी एक असा क्षण येतो की जेंव्हा I just feel like giving up. स्नायू रक्तपुरवठ्यासाठी धडपडत असतात, हृदयाचे ठोके रिमिक्स गाण्यासारखे वाजत असतात; आणि पाय पुढे उचलावासा वाटत नाही. नेमकं तेंव्हाच थांबायचं नसतं. एकदा का हा क्षण ओव्हरकम केला, की पुढे काहीच त्रास जाणवत नाही. इथेही तसं झालं. स्वतःला मनातच दोन शिव्या दिल्या आणि पाय रेटले. 
अशात परेश ने सुक्या मेव्याने भरलेली पिशवी काढली. आहाहा ! मग खारका बदाम खात चढलो वर ते असं की सालं दमायला झालंच नाही. उरली सुरली कसर पावसाच्या शिडकाव्याने पूर्ण केली. आणखी काही वेळ जंगलमाती तुडवली आणि मग दिसल्या त्या २ उंचच उंच शिड्या. NOW WE'RE TALKIN ! या ट्रेकची खरी मजा तर या शिड्यांत होती. रतनगडाच्या शिडीच्या वाटेवर अशा पाच शिड्या आहेत. सावकाश पण मजा घेत त्या चढलो आणि समोर रतनगडाची ती विशाल गुहा दिसली. 'क्या बात है !' म्हणून पुढे झालो. 

आमच्या आगोदर एक ग्रूप तिथे आला होता. ते गडफेरीसाठी बाहेर पडत होते. 'माकडं फार त्रास देतायत बरं का! आम्ही आत्ताच मोठ्या प्रयत्नांती त्यांना हाकललंय. गुहेचं दार लावून जा.’, त्या ग्रूप ने आम्हाला काही सूचना दिल्या. माकडं तिथे हजर झालीच. परेश ची देहाकृती बघूनच त्यांची पाचावर धारण बसली असावी, कारण तो फक्त काठी घेऊन त्यांच्या पुढ्यात उभा राहिला आणि दोन-चार मिनिटात माकडं शिस्तीत आल्या पावली परत गेली. त्याला गार्ड वर ठेवून मी आणि अनिकेत ने बॅगा गुहेत ठेवल्या, एकमेकासोबत बांधल्या; महत्वाचं सामान जवळ घेतलं, जसं की कॅमेरा, मोबाईल, पाकिट, आणि विजेरी; आणि आम्हीही नेढ्यात जायला निघालो.
ट्रेकक्षितिज वरून घेतलेला नकाशा सॉलिड कामी आला ब्वा. रस्ता बघत बघत पायवाटेने निघालो. पावसाळा जस्ट संपल्याने गवत माजलेलं होतं, आणि पायवाट दर पावलाला शोधावी लागत होती. रतनगडावर पावसाळ्यानंतर एक महिना म्हणजेच ऑक्टोबर च्या दरम्यान रानफुलांची गर्दी झालेली असते. कास पठाराची आठवण व्हावी इतपत.     किमान सूर्यास्ताची केशरी झळाळी तरी दिसेल असं वाटत असतानाच कुणीतरी वरून ढग ओतायला सुरुवात केली. काही क्षणात आकाशात एकच रंग उरला. राखाडी-पांढरा. हिरमोड झाला खरा. पण नेढ्याची ती अरूंद पायवाट असले काहीही विचार मनात येउच देत नव्हती. जपून चालत आम्ही एकदाचं नेढं शोधलं. ‘यो‘ मूमेंट होती. दुसरा ग्रूपही बरोबरच होता. फोटोसेशनं झाली आणि मग वळलो त्रिंबक दरवाज्याकडे. हा अतिशय चांगल्या स्थितीत असलेला दरवाजा आहे, त्याला जाणा-या पाय-या मला रायगडाच्या पालखी दरवाज्याची आठवण करून देत होत्या. खुट्ट्याच्या आणि रतनगडाच्या मधून येणारी वाट ही तिथे येते. तिथे काहीसा वेळ घालवून परत फिरलो. एव्हाना तो दुसरा ग्रूप परत पोहोचला होता, आणि आम्ही तिघेच चालत होतो. आणि मग! सूर्यास्त बघता आला नाही याची खंत पुसून टाकायला इंद्रधनुष्य अवतरलं ना राव! अनपेक्षित पणे दिसलेलं ते झकास इंद्रधनुष्य आम्ही काही वेळ न्याहाळत बसलो; अगदी ते फिकट होईपर्यंत. मग पुढे कात्राबाईचे कडे बघितले. मावळत्या उजेडात ते आणखीनच रौद्र वाटत होते. सह्याद्रीच्या या रांगेतील पर्वत बाकी सह्याद्रीपेक्षा दिसायला जास्त रौद्र आहेत असं मला वाटतं.

इंद्रधनुष्यानंतरही सरप्राइझेस संपली नव्हती. गुहेत पोहोचल्यावर आम्हाला जाणीव झाली की पावसाने लाकडं ओली झाली असतील, आणि इथे कुणी सरपण आणूनही ठेवलं नाहीये, आणि आपणही वर चढताना  काही जमवून आणलं नाहीये. सो! मॅगी होणार कसं? आणि मग सरप्राइझ दिलं ते कल्याण वरून आलेल्या त्या ग्रूप ने. त्यांचा क्लिक्स चा स्टोव्ह दिसला. तो ५ मिनिटं मागून घेऊ, असं आमचं खलबत शिजत असतानाच, त्यांनी आम्हाला चहा हवा का असं विचारलं. हो नाही.... केलंच नाही आम्ही! डायरेक्ट आमच्याकडचे पेपर ग्लास त्यांना दिले आणि मग त्यांनी दिलेल्या चहाचे घोट घेत त्यांचे आभार मानले. 
 
कुकिंग अजून बाकी होतं. त्यांची खिचडीची तयारी होईस्तोवर त्यांनी आम्हाला स्टोव्ह वापरायला दिला. पट्ट्कन आम्ही मॅगी करून घेतलं. दमल्यावर खाल्लेलं ते मॅगी काय चविष्ट लागलं हे सांगता येणार नाही. भूक तर कडाडून लागलेलीच होती, त्यामुळे बघता बघता ते फस्त झालं. कल्याणच्या ग्रूप चे भेंड्या खेळण्याचे बेत परेश सारख्यालाही धडकी भरवत होते. त्यामुळे आम्ही खिचडीचा हव्यास न करता गुहेबाहेरच्या (त्यातल्यात्यात) समतल जागेवर तंबू लावला आणि पाठा टेकल्या.
माझी झोप तिथे असलेल्या मंडळींच्या आवाजागणिक चाळवत होती. अनिकेत, परेश गाढ होते. पुढे अडीच तीन नंतर माझाही डोळा लागला आणि डायरेक्ट पावणेपाच ला गजर वाजला कुणाचातरी तेंव्हा उठलो. सूर्योदय दिसण्याची चिन्ह कमीच होती त्यामुळे नेढ्याचा चान्स न घेता गुहेतूनच सूर्योदय बघायचं ठरवलं. आणि सूर्यानेही आम्हाला अगदी पूर्ण निराश न करता आकाशात थोडंफार शेडिंग करून दाखवलं. 
थोडावेळ रमून आम्ही सव्वा आठ वाजता गड उतरायला चालू केला. अर्थातच उतरताना आरामात, न दमता आम्ही चालत होतो. अकरा वाजता आम्ही प्रवरा नदीच्या त्या बांधावर पोहोचलो जिथून शिडीवाटेचा ट्रेक सुरू होतो. बाजूलाच अमृतेश्वराचं दर्शन घेतलं. हजार वर्षापूर्वी बांधलेलं हेमाडपंथी मंदिर बघण्यासारखं आहे. अद्वितीय कातळसौंदर्य. मग चहा घेऊन मुंबईची वाट धरली. ट्रेक अजून संपला नव्हता. दळवी दरबार मधली चविष्ट खादाडी बाकी होती, आणि अर्थातच; पुढच्या ट्रेक चं प्लॅनिंग !