तीर्थक्षेत्री जाण्यासाठी योग यावा लागतो म्हणतात. तसंच काहीसं झालं. ट्रेकिंग ची, गड किल्ल्यांची आवड लागून दोन वर्ष झाली परंतु दुर्गदुर्गेश्वर रायगड ला जाणं झालं नव्हतं. खरं तर जून मधलाच हा प्लॅन होता. पण एक नाही दोन वेळा पुनर्नियोजित झाला होता. शेवटी तो योग आला. रायगडास जाणे झाले, शिवतीर्थाची भेट झाली.
रायगड ट्रेक योजला. तिघांची टीम जमली. आमच्यासोबत पहिल्यांदाच येत असलेला, पण आमचा शाळेपासूनचा मित्र असलेला, आणि आमच्या तिघांपैकी खरंच 'शिवभक्त' असलेला अनिकेत. चढवय्ये च्या फाउंडर मेंबर्स पैकी एक, ट्रेकला जाण्यासाठी सदा उत्साही असणारा, विनोदभूषण, रॉकपॅच चा राजा, स्वानंद; आणि मी.
दुपारी अकरा वाजता निघायचं ठरलं होतं. त्यानुसार आरामात उठलो, आवरून बॅग भरली. घाईघाईत, सर्वसाधारण आणि विशेष आवडी-निवडी लक्षात घेऊन, चार एक जीबी ची गाणी पेनड्राईव्ह मधे भरून घेतली. सॅक च्या वजनात या वेळी आम्ही नव्यानेच घेतलेल्या तंबूची भर होती. सुमारे साडेचार किलोचा अतिरिक्त भार.तिघे भेटलो आणि 'लेगसी कंटिन्यूज' ऑल्टो ची चाकं गरगरवली तेंव्हा साडे अकरा वाजले होते. मी आधीच गूगल गुरुजींकडून नकाशे घेतले होते आणि रस्ता मनात ठरवला होता. ठाणे-वाशी व्हाया पामबीच - खालापूर व्हाया एक्सप्रेस - खोपोली - पाली - पाचाड. पेण वडखळ चा सग्गळा ट्रॅफिक याने लागणार नव्हता. त्यानुसार निघालो. गाडीत फ्युएल होतं पण आमचं काय! मग दत्ताचा प्रसाद घेऊ म्हटलं. मिसळ, वडापाव, खरवस असं सगळं पोटात भरलं आणि विनाथांबा पाचाड ला देशमुख हॉटेल समोर गाडी लावली. पाच वाजून गेले होते. देशमुखांकडे न्याहारी केली, पुढे पायथ्याशी गाडी पार्क केली आणि सामान पाठींवर लादून पाय-या चढू लागलो.
स्वराज्याच्या राजधानीला जायची ओढ इतकी होती की काही मिनिटातच आम्ही ब-याच पाय-या चढलो. पण मग भाता वाजायला लागला होता. त्यामुळे दमाने घेत, बेताच्या वेगाने पुढे चढणं सुरू ठेवलं. एखाद्या पदार्थावर मिरपूड शिंपडावी, किंवा मीठ शिंपडावं, तसा पाऊस पडत होता, आणि आमच्या ट्रेक ची चव वाढवत होता. सद्ध्या पावसामुळे एक सुप्पर धबधबा गडाच्या वाटेवर कोसळतोय. तो ओलांडला. पुन्हा काही वेळाने तोच धबधबा आडवा आला. 'भिजा की...' असं म्हणाला. 'येताना नक्की' असं त्याला आणि एकमेकांना म्हणून तो दुस-यांदा ओलांडला. हा धबधबा तीन वेळा गडाच्या वाटेला छेदून जातो. काहीवेळाने वर बघतो तो महादरवाज्याबाजूचे दोन भव्य बुरूज दृष्टीस पडले. त्यांना बघून मला किल्ल्याच्या भव्यतेची कल्पना आली. विशाल बुरूज आणि महाराजांच्या सगळ्याच गडांप्रमाणे त्यात 'दडलेला' महादरवाजा दिसला आणि आम्हाला एक वेगळाच आनंद झाला. रायगड हा आदर्श स्थापत्यकलेचा नमुना आहे असं विधान आप्पा परबांनी त्यांच्या पुस्तकात केलंय; त्याच्या वैधतेची प्रचीती यायला सुरुवात झाली.
पुढे अर्ध्या तासात आम्ही एका पत्र्याच्या शेड जवळ पोचलो. ती जिल्हा परिषदेची रहायची व्यवस्था होती. ती फुल्ल असणार याची आम्हाला कल्पना होतीच. पण तरीही तिथल्या एका व्हरांड्यात आम्हाला राहता येईल का ते विचारलं. त्याला तिथल्या माणसाने होकार दिला. मग आणखी पुढे व्यवस्था शोधण्यास जायची गरज नाही यावर एकमत केलं आणि आम्ही त्या शेड मधे प्रवेश केला. खरं न वाटावं इतकं अचूक टायमिंग साधून पावसाने कोसळायला सुरुवात केली. 'बरं झालं अजून पुढे नाही गेलो' असं म्हणत असतानाच मातीमिश्रित पाण्याने ओल्या झालेल्या त्या जमिनीवर बसण्याचीही सोय नाही, तर झोपायचं कसं? हा प्रश्न आम्हाला पडत होता. तंबू लावायचं ठरवलं. एव्हाना मिट्ट काळोख झाला होता. आसपास ४-५ ट्रेकिंग ग्रूप्स आलेले होते त्यामुळे गजबज होती. खालच्याच देशमुखांचं वरतीही खाण्याचं हॉटेल आहे. तिथे राईसप्लेट जेवलो. दमल्यावर सगळंच छान लागतं, म्हणून नाही, तर जेवण खरंच चांगलं होतं, त्यामुळे जेवल्यावर छान वाटलं. मग भिजतच त्या शेडमधे परतलो.
तंबू उभारला आणि मग आम्हाला जो दिलासा मिळाला, तो औरच होता. कपडे बदलून, फ्रेश होऊन तंबूत शिरलो, टेकलो आणि निद्राराधना करू लागलो. स्वानंद ला अत्यानंद झाल्याने त्याची ब्रम्हानंदी टाळी लागायला वेळ लागला नाही. मी आणि अनिकेत आपले गप्पा मारत पडलो होतो. हळूहळू डोळे मिटू लागले. रात्रभर झोप म्हणावी अशी लागलीच नाही. गड बघायची उत्सुकता आणि पावसाने चालवलेला थयथयाट; त्यात झोपणं स्वानंदच जाणे. मधूनच तंबूच्या बाहेर दोन उभे कान असलेली बॅटमॅन सदृश सावली मला जागं करी. एक दोन वेळा हाताने ढोसून मी त्या कुत्र्याला बाजूला केलं, पण बिचारा कुडकुडत पुन्हा येऊन बसत होता, मग विचार केला, की जाउ देत, झोपू दे त्यालाही तंबूला टेकून. पत्र्यावर पाऊस अक्षरशः मशीनगन सारखा वाजत होता. अव्याहत. त्यात वारा. त्यामुळे छोटे मोठे दगड येऊन पत्र्यावर आदळत होते आणि आम्हाला जागं करत होते. उद्या सूर्यदेवाचं, गडाभोवतीच्या परिसराचं, किंवा आकाशाचं दर्शन होणं कठीण आहे ही कल्पना ढगांसारखीच दाट होत होती. सहा वाजता 'निळा प्रकाश दिसतोय, उठ' अशी अनिकेत ने हाक दिली. प्रकाश होता असं नाही, पण अंधार नव्हता. तंबू आवरला, तयार झालो, बॅगा पॅक केल्या आणि देशमुखांकडे चहा पिऊन गडफेरीला निघालो.
गडाबद्दल मी काय आणि कसं सांगू हे मला कळत नाहीये. इतका ग्रँड, प्रचंड विचार करून, आणि सूक्ष्मात सूक्ष्म गोष्टी ध्यानात ठेवून बांधलेला गड मी आधी बघितला नव्हता. रायगडात ख-या अर्थाने स्वराज्याचं सार आहे असं मला वाटतं. गंगासागर तलावाच्या बाजूने आम्ही सुरू केलेली फेरी पालखी दरवाजा, राणी महाल, स्तंभगृह, सचिवालय, महाराजांचा राजवाडा, टांकसाळ, दरबार, धान्यकोठार, होळीचा माळ, बाजारपेठ, अशी ठिकाणं बघत कशी रंगत गेली आम्हालाच कळलं नाही. प्रत्येक वास्तू अंगावर काटा आणत होती. मेघडंबरी मधे महाराजांच्या मूर्तीकडे बघताना मी कधी माझ्यात हरवलो मलाच कळलं नाही. वर्णन करण्यापलिकडची ती गोष्ट होती. 'किल्ले रायगड स्थळ दर्शन' या आप्पा परबांच्या पुस्तकात नोंदलेली १०० च्या वर ठिकाणं तर आम्ही बघू शकलो नाही. पण त्या पुस्तकात ती वाचली आहेत त्यामुळे पुढच्या खेपेस ती बघूच. तसंही हा किल्ला म्हणजे परत परत येण्याची जागा आहे हे इथे येण्या आधीच मनाशी ठरवलेलं होतं.
अनिकेत ला मेघडंबरी मधल्या महाराजांच्या पुतळ्याजवळ काही काळ घालवायचा होता. त्यामुळे तो तिथे थांबला, व मी आणि स्वानंद पालखी दरवाज्याच्या आसपासची काही ठिकाणं बघायला गेलो. नंतर तिघे मिळून टकमक टोकाकडे निघालो. जसजसे टकमक च्या जवळ जात होतो, तसतसा वारा वाढत होता. रेलिंगच्या कडेकडेने टकमक टोकावर पोचलो. ३-४ जणांनी तुम्हाला ढकलावं, साधारण इतका वा-याचा जोर होता. त्यामुळे रेलिंग ला धरूनच उभे होतो. टकमक बघायला दिसत काहीच नव्हतं. थोडा वेळ वारा आणि ढगांचा रौद्र खेळ अनुभवला आणि ट्रेक मधल्या त्या सर्वोत्तम स्थळावरून मागे फिरलो.
परत आलो तेंव्हा जवळपास एक वाजला होता. बॅगा उचलल्या आणि गड उतरायला सुरुवात केली. ठरल्याप्रमाणे मी आणि अनिकेत ने धबधब्याचा मान राखला. स्वानंद ला त्यात फार रस नसल्याने त्याने बाजूलाच उभं रहाणं पसंत केलं. सुमारे दीड तासात आम्ही परत गाडीजवळ येऊन पोचलो. गाडी देशमुखांकडे थांबवली. झुणका भाकरी वर ताव मारला. तृप्त झालो. आणि महाराजांना मनोमन वंदन करून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.
एक अफाट अविस्मरणीय ट्रेक केल्याचं समाधान होतं. पाउस वा-याचा धुडगूस, बोचरी थंडी, ढगात हरवलेले तिथल्या इमारतींचे अवशेष, तिथे क्षणोक्षणी जाणवणारा शिवाजी महाराजांचा वास, या सगळ्यांनी आमची मनं भरून गेली होती. या आणि जुन्या ट्रेक च्या आठवणी काढत घर कधी गाठलं कळलंच नाही. पण रायगड ला पुन्हा लवकरच जाऊ हे मात्र आम्ही एकमेकांना अच्छा करताना पक्कं केलं.