ठाणे जिल्ह्यातला सर्वात उंच किल्ला, माहुली. उंची सुमारे २८१५ फूट. माझ्या एका मित्राने २०१० साली हा किल्ला सुचवला, तिथे जायची योजना आखली, आणि आम्ही तीन मित्र तिथे ट्रेक ला गेलोही. पण काठिण्य पातळीचा चुकलेला अंदाज, पाण्याची कमतरता, शिवाय तापलेला सूर्य, अशा कारणांनी अर्ध्यातून परत आलो. पण तेंव्हापासून `माहुली' आमच्या अजेंड्यावर होता. २३ फेब्रुवारी २०१३ ची योजना फिक्स झाली. बघता बघता आठ जण जमलो आणि माहुली ला निघालो.
ठाण्यापासून ६१ किलोमीटर वर, शहापूर नजीक माहुली किल्ला आहे. नाशिक हायवे वर पडघा सोडताच डावीकडे ६-७ छोटे मोठे सुळके आपलं लक्ष वेधायला लागतात. एक आडवी पसरलेली ही डोंगररांग आहे. हा किल्ला बांधला कुणी याची खात्रीशीर नोंद इतिहासात नाही. शहाजी राजे, बाल शिवाजी आणि जिजामाता यांनी काही काळ इथे वास्तव्य केले आहे. पुरंदर च्या तहात मराठ्यांनी हा किल्ला गमावला. पुढे ३ वर्षात शिवाजी महाराजांनी एकंदरित २५० किल्ले पुन्हा काबीज केले, त्यात माहुलीचा समावेश होता. या आडव्या डोंगरावर खरंतर तीन गड आहेत, पळसगड, मध्यात माहुली, आणि भंडारगड. भंडारगडाच्याच बाजुला, नवरा-नवरी आणि भटजी, वजीर, नव-याची करवली, नवरीची करवली, अशी नामाभिधानं असलेले सुळके आहेत. हे ट्रेकर्स व रॉक क्लाईंबर्स ना आकर्षित करतात.
माहुली किल्ला तसा सोप्या श्रेणीत येतो. पण ट्रेक कठीण आहे. कठीण एवढ्यासाठी की सतत खडा चढ आहे आणि थांबायला मिळेल अशा किंवा जिथे पायांना आराम मिळेल अशा जागेचा अभाव. त्यामुळे कठीण नसला तरी दमवणारा ट्रेक आहे. अनुभवी ट्रेकर ला दोन ते सव्वा दोन तास पुरतात वर जायला. साधारण दीड्-पावणे दोन तास उतरायला. असा एक दिवसात होणारा हा ट्रेक आहे.
आम्ही सकाळी ९ ला पायथ्याशी पोहोचलो. चहा व मिसळ असं फ्युएल पोटात भरलेलं होतं. पायथ्याशी, विलास ठाकरे नामक व्यक्तीचं दुकान्/हॉटेल आहे. शिवाय गडवाटेची माहितीही ते आनंदाने पुरवतात. ९२०९५ २६२६८ हा त्यांचा भ्रमणध्वनी. गडाच्या पायथ्याशी असलेल्या देवळात गडाचा नकाशा आहे, त्याचा फोटो जरूर घेऊन ठेवावा. उपयोगी पडतो.
त्यांच्याकडून वाटेचा अंदाज घेतला आणि मार्गस्थ झालो. जे पटापट चढले त्यांना २ तास वरपर्यंत पोहोचण्यास पुरले. बाकीचे सुमारे ३ तासांनी पोहोचले. साधारण ४ टेकड्या पार करून गेलो की एक शिडी लागते. शिडी ब-यापैकी सुस्थितीत आहे. गड ८०% चढल्यावर पुढे २-३ कातळाचे पॅच लागतात. वरतून दिसणारा परिसर सुरेख आहे. हवेत फार ढग, धुकं, धूर नसल्यास तानसा जलाशयही दिसतो. पावसाळ्यात सगळा परिसर हिरवागार असतो. धबधबे वहात असतात. पण आत्ता उन्हाळ्यात मात्र निवडुंगांचं आणि रानफुलांचंच राज्य असतं.
वाटेत काही खत्राट स्पॉट लागतात. तिथून निसर्गाचं अप्रतिम दर्शन होतं.
गडावर विशेष काहीही उरलेलं नाही. गडावर प्रवेश केल्यावर समोरच एक पाण्याचं मोठं टाकं दिसतं. त्याच्या डावीकडून पुढे गेल्यावर आपण एका मोठ्या वृक्षापर्यंत पोहोचतो. जिथून लगेच खाली आपल्याला कल्याण दरवाजा, व काही गुहा आढळतात. गुहा स्वच्छ नाहीत. गावातल्या किंवा गावाबाहेरच्या बेजबाबदार लोकांनी येऊन या गुहांमधे चिकन/दारू चे सॉलिड बेत केलेत, करतात, हे समजतं. शिवाय `स्वप्नील बदाम स्वप्नाली', `अजय बदाम मोना' अशा महान व्यक्तींचा उल्लेख गुहांच्या भिंतींवर आढळतो.
कल्याण दरवाजा भंगलेल्या अवस्थेत आहे. तिथे असलेल्या माहिती देणा-या फलकावरही आधुनिक कोरीवकाम केलेले आढळते. आपल्या इतिहासाबद्द्ल असलेल्या आस्थादारिद्र्याचं हे एक उदाहरण.
तिथे थोडा वेळ विसावून विलास ठाकरेंना फोन केला. भंडारगडावर जाऊन यायला किती वेळ लागेल त्याचा अंदाज घ्यायला. पण उरलेलं पाणी, उरलेला वेळ, सर्वानुमते उरलेला स्टॅमिना, हे लक्षात घेऊन पुढच्या खेपेला भंडारगड करू असं ठरवलं आणि परतीच्या वाटेला लागलो. उतरतानाही दोन फळ्या झाल्या, एक एक्स्प्रेस, दुसरी पॅसेंजर. सुमारे ५ पर्यंत सगळे जण खाली आलो. पायथ्याशी देऊळ आहे, आणि त्या बाजूला विहीर. विहिरीचं थंड पाणी काढून हात, तोंड धुतल्यावर सगळा शीण गेला आणि आम्ही पुन्हा ताजेतवाने झालो.
या आणि मागच्या ट्रेक च्या आठवणी काढत गाड्या हायवेला लागल्या. आता सोनेरी शाल पांघरलेला माहुली `पुन्हा या' असं सांगत आम्हाला अच्छा करत होता.