Friday, April 27, 2012

That's why we're here


सकाळच्या वेळी गाडी घेऊन ऑफिसला निघालो. गाणी नाहीत तर गाडी नाही हा माझा नियम आहे. त्यानुसार गाडी सुरू करण्याच्या आधी मी गाणी सुरू केली. जरासा उशीर झाला होता निघायला. आणि दुष्काळात तेरावा म्हणतात तसं तेंव्हाच गाडीत पेट्रोलही भरावं लागणार होतं.

वाटेवरचा पहिला पेट्रोल पंप दिसला आणि मी गाडी तिथे नेली. माझ्या समोर आणखी एक गाडी उभी होती त्यामुळे मी रांगेत होतो. इतक्यात एक म्हातारेसे गृहस्थ बाजूला आले. आणि काहीतरी विचारायला लागले. काच उघडीच होती माझी पण गाण्यांचा आवाज मोठ्ठा होता त्यामुळे सुरुवातीला मला काही समजलं नाही. पण नंतर लक्ष दिलं मी; ते काहीतरी विकत होते. सलग चार ते पाच वस्तूंची नावं ते घेत गेले, मी एक मंद हसू चेह-यावर ठेवून प्रत्येक वेळेस ‘नही चाहिए’ असं म्हणत गेलो. ते तरीही पुन्हा विचारू लागले, आणि माझ्याकडून काच वर घेण्याची कृती झाली. ते काहीही न बोलता बाजूला जाऊन पेट्रोलच्या मशीनला डोकं टेकून बसले. माझ्या मनात घालमेल सुरू झाली.

मग लगेच माझा नंबर लागला, मी गाडी पुढे घेतली. पेट्रोल भरणा-याला मी विचारलं, ‘कोण आहेत रे ते?’ ‘असंच काहीतरी विकणारे आहेत’, तो म्हणाला. मला वाटलं जावं आणि त्यांना काही पैसे द्यावेत. पण म्हटलं ते काहीतरी विकून पैसे मिळवू पहात असताना त्यांना असेच पैसे दिले तर त्यांना वाईट वाटेल; कदाचित अपमान केल्यासारखं होईल. पण खरंच गरज असेल तर? ती व्यक्ती Genuine वाटत होती; त्यामुळे अजूनच घालमेल वाढत होती माझी.

पेट्रोल भरून झालं; मी पैसे दिले आणि विचारांना दारातून बाहेर लोटल्यासारखं करून मी गाडी सुरू केली आणि तिथून निघालो. स्टिरिओ वर पुढचं गाणं लागलं, ‘Out from the deep - Enigma'. गाण्याचे शब्द असे,

 
We came out from the deep
to learn to love, to learn how to live
We came out from the deep
to avoid the mistakes we made
That's why we're here.
That's why we're here.

We came out from the deep
to help and understand, but not to kill
It takes many lives till we succeed
to clear the debts of many hundred years.
That's why we're here.
That's why we're here.



ती घटना, हे गाणं, हे शब्द, आणि माझ्या मनातले विचार... सगळं एकदम स्ट्राईक झालं मला. सालं योगायोगाने लागलेलं हे गाणं, आधी अनेकदा ऐकलेलं गाणं, पण त्या वेळी, त्या गाण्याने, जणू झाल्या गोष्टीला हात धरून आणून माझ्यासमोर पुन्हा उभं केलं. एक विचार आला की हे शब्द मला लागू होतायत का? काच बंद करण्यात, दुर्लक्ष करण्यात माझी चूक झाली का? ... आणि त्या विचाराने मी विचलित झालो. लगेच दुसरा विचार आला, की हेच; हेच शब्द त्या व्यक्तीलाही लागू होत असतील की ! ... कदाचीत ही त्याला येणारी ‘That's why we're here’ ची प्रचीती असेल...

एक, दोन, तीन, अशी दहा समीकरणं डोक्यात जुळंत गेली, आणि विरत गेली. त्यानंतर बराच वेळ मात्र माझं कशात लक्ष लागलं नाही...

इतर कुणी ‘भिकारी’ असता तर मी इतका विचार केलाच नसता. कारण भिकारीही आजकाल खरे नसतात. ‘खायला देतो’ म्हटलं तर तुसड्यासारखं ‘नही चाहिये; पैसा देना है तो दो’ असं म्हणणारे हलकट लोक असतात. यात लहान दिसणारी मुलंही आली. पण ही व्यक्ती चांगल्या घरातली दिसत होती, आणि खरी वाटत होती, म्हणून केवळ इतका परिणाम झाला.

पुढे इतर गोष्टीत गुंतलो तरी मधेच कधीतरी हा विचार पुन्हा डोकं वर काढायचा. असे २ दिवस गेले. आणि पुढच्या दिवशी मी पुन्हा त्या पेट्रोल पंपावर त्याच वेळेच्या सुमारास गेलो; की ते गृहस्थ मला दिसतील आणि मी, अशीच नाही, पण त्यांच्याकडची एखादी गोष्ट विकत घेऊन त्यांची मदत करीन. पण ते मला तिथे दिसलेच नाहीत.

आता फक्त मी एवढीच प्रार्थना करतो, की माझ्याकडून राहिलेली मदत त्यांना इतर कुणाकरवी व्हावी, आणि ते ज्या कुठल्या अडचणीत असतील ती मिटावी, कमी व्हावी.

एनिग्मा चं हे ते गाणं.