बराच वेळ बस थांब्यावर उभा राहिलो. घराजवळ जाणारी बस आलीच नाही. त्यातल्या त्यात जवळ जाणा-या ज्या बस आल्या त्यापैकी बहुतांश बस चालकांनी थांबवल्याच नाहीत. हा पहिला अनुभव नव्हता माझा; या आधीही अनेकदा बस नुसतीच हळू करून प्रवासी दाराजवळ पोचताच बस वेगात नेणा-या बसचालकांनी माझं डोकं फ़िरवलेलं आहे. यात त्यांना काय सिद्ध किंवा साध्य करायचं असतं हे तेच जाणोत. पण या वेळी असं होऊ द्यायचं नाही, चिडायचं नाही असं ठरवून मी वातानुकूलित बस, जी सुदैवाने थांबली आणि काहीशी रिकामी होती, ती पकडली. वरील सगळे संदर्भ ’बेस्ट’ च्या बसेस बाबत आहेत याची नोंद घ्यावी. टीएमटी किंवा इतर बस सेवांचा अजून तरी या बाबतीत वाईट अनुभव आलेला नाही.
तर, वातानुकूलित बस मधे चढलो; आणि काही मिनिटात बसायला जागा सुद्धा मिळाली. तिकिटाच्या जास्त दराच्या मोबदल्यात मिळालेला थंडावा आणि शांतता या दोन्हींचा आनंद घ्यावा म्हणून डोळे मिटले आणि काही मिनिटातच दोन व्यक्तींच्या बोलण्याचा आवाज आला; काहीसा जोरातच. एक प्रवासी जो मागच्या सीट वर बसला होता, आणि अनवधानाने ज्याचा एक थांबा चुकला होता, तो चालकाला दरवाजा उघडण्याची ’विनंती’ करत होता. (वातानुकूलित बस असल्याने दरवाजे बंद होते.) बस वाहतुकीच्या थांब्यावर थांबलेली होती. चालकाने दरवाजा उघडायला नकार दिला. प्रवाशाने अतिशय सौजन्याने पुन्हा विनंती केली परंतु चालकाने "आमच्या नियमात ते बसत नाही. तुम्हाला पुढच्या बस थांब्यावरच उतरावं लागेल." असं ठासून; नव्हे, दरडावून सांगितलं. प्रवासी सज्जन होता, त्यामुळे शिव्या, अर्वाच्च्य शेरे किंवा टोमणे न उच्चारता शांतपणे उभा राहिला आणि पुढच्या थांब्यावर उतरला.
त्यानंतर त्या चालकाने अनेक वाहतुकीचे थांबे जुमानले नाहीत. एक दोन बसथांब्यांवरही त्याने बस थांबवली नाही. पण बसथांब्याव्यतिरिक्त इतर जागी उतरू न देण्याचा नियम मात्र त्याने पाळला होता.
तेंव्हा म्हटलं; नियम, नियमीतपणे पाळावेत एखाद्याने; सोयीस्कर पणे नव्हे. आणि हो, नियम सर्वांसाठी असावेत; ठराविक व्यक्तींसाठी, गोष्टींसाठी नाही. दुर्दैवाने, भारतात नियम ही सोय या अर्थाने वापरली जाणारी संज्ञा आहे; नियमीतपणे.
http://ajstates.blogspot.com/2011/05/blog-post_6978.html