Saturday, September 11, 2010

३१ जुलै रिटर्नस

३१ जुलै. सीए लोकांसाठी या दिवसाचं महत्व तितकंच आहे जितकं वारक-यांसाठी आषाढी एकादशीचं. या दिवसाची अनेकांना माहिती असेल कारण हा दिवस बहुतांश करदात्यांसाठी आपली आयकर विवरण पत्रे (मराठीत इनकम टॆक्स रिटर्नस) आयकर विभागाकडे जमा करण्याच्या मुदतीचा शेवटचा दिवस असतो. नव्हे, तो एक सोहळाच असतो. अनेक छोट्या मोठ्या सीए फ़र्मस या दिवसासाठी युद्धपातळीवर काम करत असतात. साधारण एक महिन्यापूर्वीपासून या सोहळ्याचा पूर्वरंग सुरू होतो. सोपी सोपी छोटी छोटी रिटर्नस पटापट पूर्ण होऊन आयकर कार्यालयातील कागदपत्रांच्या विशाल सागरात विसर्जित होतात. जसजसे दिवस पुढे जातात तसतशी मोठी, क्लिष्ट रिटर्नस ऒफ़िसात येऊ घालतात. ऒफ़िस संपण्याची ५:३० ची वेळ कलाकलाने वाढून ६, ७, ८ कडे झुकायला लागते आणि इनकम टॆक्स चे ग्रंथरुपी तारे टेबलाच्या क्षितिजावर उगवू लागतात.



तरीही सगळं सुरळित चालू असतं. पण काही हुश्शार मंडळी ३१ जुलै च्या अगदी एक दिवस आधी जागी होतात आणि आपापल्या सीए कडे धाव घेतात. आणि मग या सोहळ्याला खरी रंगत येते. कामाचा ताण, धावपळ, एकंदरीत सगळंच टीपेला जातं. हा वाढता ताण हलका करण्यासाठी संध्याकाळ्च्या वेळी न्याहारी, शीतपेय असा बेत ऒफ़िसमधेच केला जातो. काही ऒफ़िसात न्याहारीबरोबर रात्रीच्या जेवणाचाही बेत होतो.

मग एक एक रिटर्न तयार करून आयकर कार्यालयात जमा करण्यासाठी पाठवलं जातं. गणेशोत्सवात जसे मानाचे गणपती असतात, तशीच इथे मानाची रिटर्नस असतात. ती निर्विघ्न जमा करून झाली की सीएंच्या आणि त्यांच्या ऒफ़िसातल्या कर्मचा-यांच्या डोक्यावरचा मोठ्ठा भार हलका होतो. बाकी छोटी रिटर्नस पुढेमागे जातंच असतात.

३१ जुलै ची संध्याकाळ. ४ - ४:३० पर्यंत बहुतेक सगळी रिटर्नस पाठवून झालेली असतात. थोडासा शिथीलपणा आलेला असतो तरीही पूर्णविरामाशिवाय वाक्य पूर्ण होत नाही तसंच इथे जोपर्यंत शेवटचं रिटर्न जात नाही तोपर्यंत कुणीच शांतपणे पाठ टेकत नाही.

मग रिटर्न भरण्याच्या मुदतीची तारीख पुढे ढकलल्याची बातमी येते. जवळ्जवळ प्रत्येक वर्षी ही तारीख पुढे ढकलली जाते. तरीही जोपर्यंत ती पुढे ढकलल्याची बातमी येत नाही तोपर्यंत सगळे जण नुसते धावाधाव करत असतात. अखेर तशी बातमी येते. फ़ुग्यातली हवा काढावी त्याप्रमाणे सगळ्यांच्या हालचाली मंदावतात. ऒफ़िसांमधली धावपळ थांबते आणि या सोहळ्याची पूर्णविरामाशिवाय समाप्ती होते.

त्यानंतरही दगदग, ताण, धावपळ, सगळं चालू रहातं, पण असा सोहळा मात्र पुढील ३१ जुलै पर्यंत अनुभवता येत नाही.