Monday, April 19, 2010

निर्गुणाचा संग धरिला जो आवडीने


एका कोर्स साठी १५ दिवस दादरला जावं लागणार होतं. सुदैवाने - जण बरोबर असल्याने प्रवासाचा त्रास कमी जाणवेल ही भावना होती. १५ दिवसांपैकी हा दुसरा दिवस होता. नेहमीची गाडी चुकल्याने आम्ही :५१ च्या ठाणे सीएसटी लोकलसाठी सज्ज झालो. सज्ज अशासाठी की लोकल फ़लाटावर शिरतानाच उडी मारून जागा पकडायची होती.

लोकल आली. आम्ही मिळेल त्या दारात उड्या टाकल्या. मी आणि माझा एक मित्र, आम्ही एका डब्यात शिरलो. उडी मारण्याच्या प्रयत्नांना यशही आलं; जागा मिळाली. स्थिरस्थावर होतानाच लक्शात आलं की हा भजन मंडळींचा डबा आहे. लोकलमधे भजनं म्हणणारी अशी अनेक मंडळं आहेत. अनेकदा मागच्या पुढच्या डब्यातून किंवा बाजूने जाणा-या लोकलमधून त्यांचा आवाज ऐकलेला होता पण खुद्द त्यांच्यात जाऊन बसण्याची ही पहिलीच वेळ होती.

गाडी स्टेशन वर उभी असेपर्यंत त्यांच्या मंडळातील एक एक व्यक्ती येत गेली. गाडी सुटल्यावर भजनास सुरुवात झाली. सुरुवातीला एक श्लो म्हणून मग त्यांनी एकापेक्शा एक सुरस रचना म्हटल्या. आवाजाच्या जादूत भर घालण्यासाठी एक म्रुदुंगसद्रुश नाद येण्याच्या द्रुष्टीने तयार केलेला बोंगो, आणि - चकवा ही वाद्य होती. ’जय जय राम क्रुष्ण हरी’, ’रूप पाह्ता लोचनी सुख झाले हो साजणी’, ’यशोदे तुझा लाडका, कान्हा तुला मारी हाकाअशी अप्रतिम भजनं, अभंग ऐकत दादर कधी आलं कळलंच नाही. तीच भजनं गुणगुणंत पुढे दिवस कसा गेला तेही कळलं नाही.

दुस-या दिवशी ठरवून :५१ ची गाडी पकडली आणि ठरवून तोच डबा. तेव्हापासून तोच डबा आमचा नेहमीचा डबा झाला. हळूह्ळू त्या भजनमंडळींना अजून बारकाईने निरखू लागलो. ’साईनाथ भजनी मंडळअसं त्या मंडळाचं नाव. पात्रओळखही होऊ लागली. सुरुवातीची - भजनं म्हणण्याचा मान त्यांच्यातील काही ठराविक मंडळींचा असतो. त्यापुढची भजनं, अभंग म्हणायला सर्वांना संधी आणि मुभा असते. डब्यातील बाकी सगळे जण कोरस ची भूमिका चोख बजावतात. तिथे भाषा, जात यांचं महत्व नसतं. अशी साधारण त्या चाळीस मिनिटांच्या प्रवासातील कार्यक्रमाची रूपरेषा असते.

या मंडळातल्या प्रत्येकाचा सहभाग तेवढाच महत्वाचा आणि तितकाच प्रभावी आहे. तरी या मंडळातील काही जण विशिष्ट गोष्टीत पारंगत आहेत. त्यांची आपापली एक शैली आहे. त्यापैकी एक ’पांडुरंग काका’; ज्यांनी चकवा हातात घेतल्या की भजनातला शब्द न शब्द नाचायला लागतो. त्यांनी अनेक भजनांच्या स्पर्धा जिंकलेल्या आहेत. चकवा किंवा टाळ वाजवण्यात ते ’मास्टर’ आहेत. त्यांना नुसतं ऐकतच नाही तर बघतही रहावं असं वाटतं. इंग्रजीत सांगायचं झालं तर ’He is a treat to watch'.

सुरांना तालाची जोड नसेल तर ते सूर पोरके होतात. मंडळात तालाची बाजू दमदारपणे सांभाळणारी व्यक्ती म्हणजे आग्रे बुवा. बोंगोवरच्या आपल्या थापेने ते अशी जादू करतात की डब्यात उपस्थित असलेल्या प्रत्येकाला एक वेगळाच जोम येतो.

४-५ भजनं, अभंग म्हणून झाले की घाटकोपर येतं आणि त्या सुश्राव्य प्रवासाला एक वेगळा आयाम मिळतो. तिथेच ओळख पटते गौळण बुवांची. एकापेक्शा एक सरस आणि वेड लावणा-या अशा गौळणी त्याना मुखोद्गत आहेत आणि ते सामील होताच वातावरणातल्या उत्साहात भर पडते. ’ऐक यशोदे बाई, तुझ्या कान्हाला सांग काही’, ’यशोदे तुझा कान्हा, यमुनाडोही बुडाला ना’, ’यमुनेच्या काठी घडा फ़ोडिला, राधे तुझा काटा कान्हाने काढिला’... मनात भिनणा-या अशा गौळणी ऐकल्या, म्हटल्या की खरच गुंग व्हायला होतं आणि सगळं काही विसरून एका वेगळ्याच विश्वात रममाण होण्याचा आनंद मिळतो.

 
दर दिवशी नवनवीन सुरेख चालीत बांधलेल्या रचनांची भर पडायची आणि आम्ही मंत्रमुग्ध व्हायचो. तसा मी मुळीच अध्यात्मिक वगैरे नाही. पण संगीताची आवड आहे. भजन म्हणताना मी त्यात इतका तल्लीन व्हायचो की मग गाडीतली गर्दी काय, घाण काय, कसलाच त्रास व्हायचा नाही. एरवी ट्रेनने प्रवास करण्याची कितीही सवय असलेला माणूस सुद्धा ट्रेन ने जायचं म्हटलं की जरा नाक मुरडतोच. पण खरंच, हे १५ दिवस मात्र मी सकाळ होण्याची आणि :५१ सीएसटी लोकल मधे चढण्याची आतुरतेने वाट बघायचो.

एक दिवस भजनमंडळाची आगाउ परवानगी घेऊन भजनांचं शूटिंग, रेकॊर्डिंगही केलं. परंतु प्रत्यक्श अनुभव आठवला की ते रेकॊर्डिंग खूप तुटपुंजं वाटतं. अर्थात, काहीही झालं तरी कॆमेरा त्या भजनांतला भाव साठवू शकतच नाही. काही गोष्टी अनुभवूनच बघाव्यात. १५ व्या दिवशी मंडळातील एका सदस्याशी संवाद साधताना मी म्हणालो की हा जरी आमचा या ट्रेन ने येण्याचा तात्पुरता शेवटचा दिवस असला रीही पुन्हा जेव्हा कुठल्याही निमित्ताने मुंबई ला जायची वेळ येईल तेव्हा याच ट्रेन मधे याच डब्यात भेटू.

 
मी वाट बघतोय; पुन्हा त्या सगळ्यांच्यात जाउन उभं रहाण्याची; मंडळात सामील होण्याची; सुरात सूर मिळवण्याची; तल्लीन होण्याची. असाच भजनानंदात मनानंद शोधायचा असेल तर तुम्ही सुधा एखाद वेळी जाउन बघा :५१ ठाणे सीएसटी लोकल मधल्या मागून चौथ्या डब्यात. कदाचित माझ्यासारखा तुमचाही तो नेहमीचा डबा होईल